स्पर्धा परीक्षांच्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करणं आता कठीण बनलंय. कधीकाळी केवळ उच्चवर्गीय किंवा श्रीमंत कुटुंबातील मुलांसाठी समजली जाणारी एमपीएससी स्पर्धा आता गावखेड्यात पोहोचली आहे. गावखेड्यातील तरुणांना, शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, कामगाराच्या आणि गोरगरिबांच्या मुलांनीही आता एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेतून स्वत:ला सिद्ध केल्याचं पाहायला मिळत आहे. या परीक्षांचा निकाल लागल्यानंतर रिक्षावाल्याचा मुलगा तहसिलदार बनला. धुणी-भांडी करणाऱ्या आईचा लेक पीएसआय झाला, अशा बातम्या येतात.
सोशल मीडियाच्या काळात आता या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार सहज होता येत आहे. अशाच एका पीएसआय बनलेल्या मुलाचा आणि त्याच्या आईचा आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जुलै महिन्यात पीएसआय परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मुलाचा सत्कार आणि सन्मान झाला. डोक्यावर फेटा आणि गुलालाने भरलेला लेक भेटीसाठी येताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. वडिलांच्या निधनानंतर आईने मजुरी करुन पोराला शिकवलं. पोरानेही आईच्या कष्टाचं चीज केलं आणि स्पर्धा परीक्षेतून पीएसआय पदाला गवसणी घातली.
''जेव्हा मुलगा PSI होऊन घरी आला, आईचे अश्रू अनावर झाले आपल्या यशाचे सर्वात जास्त आनंद फक्त आईबाबांनाच होतो.'', असे कॅप्शन देत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण झालेला मुलगा आनंदाने आईला मिठी मारतो, उचलून घतो. त्यावेळी, आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. आई दोन्ही हातांनी डोळ्यातील अश्रू पुसत असताना, मुलगा आईच्या पायावर डोकं ठेऊन तुझ्या कष्टाचं आज खऱ्या अर्थाने जीच झालं, असंच आपल्या कृतीतून सांगत असल्याचं दिसून येतं. या व्हिडिओला एक लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात शेअरही झाला आहे.