नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक भन्नाट घटना समोर आली आहे. चहाची टपरी चालवणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षांच्या लेकीची इच्छा पूर्ण केली आहे. त्याने आपल्या चिमुकलीसाठी पहिल्यांदाच एक मोबाईल खरेदी केला आहे आणि हा क्षण कायम लक्षात राहावा म्हणून वाजत गाजत मोठी मिरवणूक काढत घरी आणला आहे. विशेष म्हणजे 12 हजाराचा मोबाईल आणण्यासाठी 15 हजारांचा खर्च केला आहे. DJ च्या तालावर नाचत त्याने हा फोन घरी आणला. सध्या गावामध्ये याच मिरवणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर मिरवणुकीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरारी कुशवाह असं या चहा विकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. मुरारी याने आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवा मोबाईल खरेदी केला. 12,500 रुपयांचा फोन त्याने खरेदी केला आणि ही गोष्ट कायम लक्षात राहावी म्हणून गावामध्ये एकच जल्लोष साजरा केला. भव्य-दिव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून DJ च्या तालावर गावातील मंडळी नाचत होती.
15 हजार खर्च करून DJ च्या तालावर नाचत फोन घरी आणला
"माझ्या घरी पहिल्यांदा मोबाईल आला आहे. त्यामुळेच वाजत-गाजत तो मी घरी आणला. मिरवणूक काढून माझ्या मुलीला मी रथामध्ये बसवून आणलं. मला एक पाच वर्षांची मुलगी असून ती गेल्या दोन वर्षांपासून मला बाबा तुम्ही खूप दारू पिता. तुम्ही दारू पिणं कमी करा आणि त्या पैशातून मला मोबाईल आणून द्या असं सांगत होती. तेव्हाच मी माझ्या मुलीला म्हटलं होतं की, तुला असा मोबाईल घेऊन येऊ की संपूर्ण गाव पाहत राहिल. मी माझ्या मित्रांना घरी बोलावून याची पार्टीही दिली आहे" असं मुरारी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.