नववर्षाच्या स्वागतासाठी गेल्या शुक्रवारपासून पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते एवढे वाहतूक कोंडीत अडकलेत की तासंतास लोकांना गाडीतच अडकून रहावे लागले आहे. अनेक गाड्या बंद पडल्याने कोंडीत आणखीनच भर पडलेली आहे. अशातच ठरलेल्या वेळेत इच्छित स्थळी पोहोचणे पर्यटकांसाठी कठीण झाले आहे. इकडे मुंबई-पुणे हायवे, साताऱ्याचा खंबाटकी घाट प्रचंड कोंडीचा ठरला आहे. तशीच परिस्थिती मनालीला जाणाऱ्या पर्यटकांची झाली आहे. यात एक एसयुव्ही चालक कमालीचा हुशार निघाला आहे.
हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पितीमधून एक व्हिडीओ येत आहे. या मनालीला जाणाऱ्या रस्त्यावर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहने पुढे काही केल्या सरकत नव्हती. घाटाच्या सुरुवातीला बाजुने नदी वाहत होती. महिंद्रा थार ही ऑफरोड गाडी, म्हणजे तशा जाहिराती तर कंपनी करते. या कोंडीत एक थारचालकही होता. त्याने वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी शक्कल लढविली, त्याची थार थेट चंद्रा नदीच्या पाण्यात उतरविली आणि दोन-तीन फुट वाहत्या पाण्यातून मार्गही काढत पैलतीरावर पोहोचला.
याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. तिकडे घाटात उंचावर अडकलेल्या कोणी पर्यटकाने थारचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला. यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यात गुंतलेल्या पोलिसांचे डोळे उघडले. असेही होऊ शकते? याची कल्पना येताच पोलिसांनी त्या थारवाल्या पर्यटकाचे चलन फाडले. एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुन्हा कोणतातही पर्यटक अशी शक्कल लढवेल म्हणून नदी किनारी बंदोबस्तच तैनात केला आहे.