Georgia Parliament fight video viral: जॉर्जिया देशाच्या संसदेतखासदारांमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'विदेशी दलाल' असे शब्द वापरलेल्या विधेयकावरून हा वाद सुरू झाला. सत्ताधारी पक्षाला हे विधेयक मंजूर करायचे आहे, पण या विधेयकाला देशांतर्गतच विरोध होत आहे. अशा परिस्थितीत झालेल्या राड्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.
जॉर्जियन टीव्ही व्हिडिओमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते मामुका मदिनारदझे यांना संसदेत बोलत असताना विरोधी खासदार अलेको एलियाश्विली यांनी धक्काबुक्की केल्याचे दिसून आले. यानंतर संसदेचे युद्धभूमीतच रूपांतर झाले. दोन्ही बाजूचे अनेक खासदार एकमेकांशी भिडले. संसद भवनाबाहेरही आंदोलक एलियाश्विली यांना पाठिंबा देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले.
नक्की प्रकरण काय?
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सत्ताधारी पक्ष जॉर्जियन ड्रीमने जाहीर केले की ते एक कायदा परत आणतील ज्यामुळे 'परदेशी दलाल' म्हणून परदेशी पैसे मिळवणाऱ्या संस्थांची नोंदणी होईल किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रत्यक्षात १३ महिन्यांपूर्वी हे विधेयक आणण्याची घोषणा करण्यात आली होती, पण प्रचंड विरोधानंतर ते रद्द करण्यात आले. पण जॉर्जियन ड्रीमचा दावा आहे की परकीयांकडून लादलेल्या 'स्यूडो-लिबरल व्हॅल्यूज'चा प्रतिकार करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हे विधेयक आवश्यक आहे.
जॉर्जिया सरकारने जाहीर केले की पंतप्रधान इराकली कोबाखिडझे यांनी सोमवारी EU, ब्रिटन आणि युनायटेड स्टेट्सच्या राजदूतांची भेट घेऊन या विधेयकावर चर्चा केली. टीकाकारांनी या विधेयकाला 'रशियन कायदा' असे संबोधले आहे आणि त्याची तुलना रशियामधील असंतोष दडपण्यासाठी क्रेमलिनने वापरलेल्या कायद्याशी केली आहे. जॉर्जियन ड्रीमवर रशियाशी संबंध वाढवल्याचा आरोपही यामार्फत करण्यात आला आहे.