boy bathing on road viral video: गेल्या दोन महिन्यांत तापमान खूपच वाढलंय. ऊन्हामुळे साऱ्यांनाच त्रास होतोय. जसाजसा मे महिना संपतोय तसे साऱ्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. मात्र अजून १०-१२ दिवस तरी साऱ्यांना ऊन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे. तमिळनाडूतील एका २४ वर्षीय तरुणाने या ऊन्हाला कंटाळून भररस्त्यात अंघोळ केली. रस्त्यावर आंघोळ करण्यासाठी त्याने १० रुपयांची पैज लावली आणि व्हिडीओ व्हायरल करण्याचे ठरवले. त्याने इरोडमधील पन्नीरसेल्वम पार्क जंक्शनवर आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या या कृतीनंतर पोलीसांनी मात्र त्याच्याबरोबर जे केलं ते साऱ्यांनीच वाचायला हवं.
रस्त्यावर उभं राहून अचानक अंघोळील सुरूवात
जिल्हा पोलिस अधीक्षक जी जवाहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख नावाच्या व्यक्तीने रविवारी बिजी जंक्शन येथे भररस्त्यात अंघोळ केली. आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या कृतीवर आक्षेप घेतला तेव्हा त्याने दावा केला की तो रणरणत्या उन्हात शांत व थंड होण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याने व्हिडीओ ऑनलाइन अपलोड केला. व्हिडीओ व्हायरल करणं हा त्याचा मूळ उद्देश होता. पण व्हायरल व्हिडीओमुळे तो प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्याच्या या कृत्याची दखल पोलिसांनी घेतली व त्याला अद्दल घडवायचे ठरवले.
वाहतूक पोलिसांनी घडवली अद्दल
व्हिडिओची माहिती मिळताच अधीक्षकांनी वाहतूक पोलिसांना फारुखला दंड आकारण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सोमवारी या तरुणाला त्याच्या कारवाईचा दंड ठोठावण्यात आला. त्याच्या स्टंटने पोलिसांचे लक्ष वेधून घेतले, त्यामुळे त्याला वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल 3,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्येही रस्त्यात आंघोळ करताना मोटारसायकलवरील एक पुरुष आणि एक महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतर काही दिवसांतच हा व्हिडिओ समोर आला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये ती महिला स्वत:वर आणि पुरुषावर बादलीतून पाणी ओतताना दिसत होती. त्यामुळे अशी चिंता व्यक्त केली जात आहे की अशा बेजबाबदार वर्तणुकीला मनोरंजन का मानले जात आहे.