सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला आपले संपूर्ण केस कापण्यासाठी खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिचं कुटुंबही तिच्यासोबत आहे. मुंडण करताना ती ढसाढसा रडू लागते. त्यानंतर कुटुंबातील सदस्यही तिला आधार देण्यासाठी एक एक करून मुंडण करून घेतात. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला कॅन्सरशी लढा देत आहे. या कारणामुळे तिला मुंडण करावं लागलं. अशा स्थितीत आधार देण्यासाठी मुलांनी देखील मुंडण केलं.
हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना आपले अश्रू आवरता येत नाहीत. हा व्हिडीओ reddit वर पोस्ट केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कॅन्सरशी झुंजणाऱ्या आईला तिच्या प्रवासात मुलं साथ देत आहेत असं लिहिलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला महिला खुर्चीवर बसून रडत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात तिन्ही मुलं येऊन तिला प्रेमाने धरतात.
मुलगा यानंतर डोक्यावरील केस काढू लागतो. यावेळी महिला खूप रडते, तेव्हाच खुर्चीच्या मागे उभा असलेला दुसरा मुलगाही त्याचे केस कापायला सुरुवात करतो. आश्चर्यचकित होऊन महिला विचारते, 'काय करतोस?' ती रडत राहते. मग तिला कळतं की तिची मुलं तिला आधार देण्यासाठी हे करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून त्याला 32000 पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटले की, 'त्या व्यक्तीचे केस कापताना तुम्हाला वेदना होत असल्याचे दिसत आहे, परंतु तो हे चांगल्यासाठी करत आहे हे तिला माहीत आहे.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.