कर्नाटकच्या मंड्या शहरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका स्कूटर चालक तरुणीने चुकीची पार्किंग करत उलट तिच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच धारेवर धरले होते. प्रकरण पीएसआयपर्यंत जाताच महिला पोलिस अधिकारी तिथे आली आणि त्या भांडखोर तरुणीच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे. या तरुणीची 'भाईगिरीची' नशाच खाडकन उतरली आहे. (women PSI slaps girl who park scooter in no parking.)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याने महिला दिनाशीदेखील जोडला आहे. ही घटना 7 मार्चची आहे. या तरुणीने तिची स्कूटर नो पार्किंगमध्ये उभी केली होती. पोलिसांनी ही स्कूटर उचलण्यासाठी कारवाई सुरु केली. ते पाहून धावत आलेल्या या तरुणीने पोलिसांसोबतच हुज्जत घालायला सुरुवात केली. तसेच ती स्कूटरवर जाऊन बसली.
तिचे म्हणणे होते की, पोलिस तिच्याकडून दंड वसूल करू शकतात पण स्कूटर जप्त करू शकत नाहीत. व्हिडीओमध्ये एक पोलिस तिची स्कूटर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र, ती तरुणी असे करायला देत नाही आणि कोणत्यातरी भाईला फोन लावते. तेवढ्यात तिथे एक महिला पीएसआय पोहोचते आणि तरुणी तिच्याशी वाद घालायला लागते. यावर पीएसआय महिलेने तिच्या कानशिलात ठेवून दिली आणि तिची भाईगिरी उतरवली. या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला पोलीस कर्मचारी त्या मुलीला स्कूटरवरून बाजुला करत असल्याचे दिसत आहे. यावर ती तरुणी आणखी चिडते. या तरुणीकडे हेल्मेटही नाहीय. घटनास्थळी आणखी काही महिला पोलीस आहेत. त्यांच्यासोबत पुरुष पोलिसही आहे.
पीएसआयने कानशिलात लगावल्यानंतर त्या तरुणीला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे तरुणीचे वय कमी असल्याने पोलिसांनी तिच्यावर पुढील कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. तसेच तिला कोणतीही कारवाई न करता केवळ समज देऊन सोडण्यात आले.