फॉर्म्यूला रेसच्या गाड्यांचे काळजाचा ठोका चुकवणारे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियात पाहिले असतील. या गाड्यांचा वेग इतका असतो की, अपघात झाल्यावर गाड्यांचा चुराडा होतो. या गाड्यांचा वेगच अपघाताचं कारण बनतो. सध्या मकाऊमध्ये फॉर्म्यूला -३ वर्ल्ड कप रेस सुरु आहे. यात जगभरातील शेकडो रेसिंग प्रेमी सहभागी झाले आहेत. याच रेसमधील एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
अपघात झालेली कार कोण चालवत होतं, असा प्रश्न यूजर्सना पडला आहे. ही कार जर्मनीची सोफिया फ्लोरश ही चालवत होती. ही महिला साधारण २७५ किमी प्रति तासाच्या वेगाने गाडी चालवत होती. अशातच तिचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी हवेत उडत एका होर्डिंगला जाऊन भिडली. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हा अपघात फारच गंभीर आहे. या अपघातात सोफियासोबतच जपानचा एक चालक शो त्सुबाई, एक मार्शल आणि दोन फोटोग्राफर जखमी झाले आहेत.
५ फूट हवेत उडाली कार
सोफिया ही केवळ १७ वर्षांची आहे. पण कार पळवण्याच्या कामात ती चांगल्या चांगल्या रेसर्सना मागे सोडते. बुधवारी तिची रेस होती. सगळंकाही ठिक सुरु होतं. पण अचानक तिचं नियंत्रण सुटलं आणि पाहता पाहता कार हवेत होती. यात कारचं चांगलंच नुकसान झालं आहे. सुदैवाने यात सोफियाचा जीव वाचला आहे.
सोफियाने ट्विट करुन फॅन्सना धन्यवाद दिले आहेत. तिने लिहिले की, 'मला सर्वांना सांगायचं आहे की, मी ठिक आहे. लवकरच माझी सर्जरी होणार आहे'.
दरम्यान हा अपघात झाल्यावरही रेस सुरुच होती. यात रेडबुल ज्यूनिअर टिमचा रेसर ड्रायव्हर डॅन टिकटुम हा विजयी ठरला. तो १९ वर्षांचा असून ब्रिटनचा आहे.