आपल्या देशात अनेक अपघात हे ड्रायव्हर प्रशिक्षित नसल्याने किंवा योग्य प्रशिक्षण न घेतल्याने होत असतात. ड्रायव्हिंग करायचे म्हणजे गिअर बदलून, क्लच-ब्रेक दाबून होत नाही. तर त्यासाठी योग्य प्रशिक्षण गरजेचे असते. अनेकजण दुसऱ्याचे पाहून गाड्या चालवायला शिकलेले आहेत. आता कुठे आपली आरटीओ प्रणाली कठोर होत चालली आहे. त्यातही अनेक पळवाटा आहेत. सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात अत्यंत काटेकोरपणे कार चालविण्याची टेस्ट घेतली जात आहे. एवढी काटेकोर टेस्ट घेतली तर आपल्याकडील ९० टक्के ड्रायव्हर फेल ठरतील, अशी ही टेस्ट आहे.
हा व्हिडीओ चीनचा आहे. तिथे ड्रायव्हिंग लायसन मिळविण्यासाठी कठोर टेस्ट द्यावी लागते. ती कठोर एवढ्यासाठी की जर तुम्ही हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला समजून येईल. भल्याभल्यांनाही एवढ्या काटेकोरपणे गाडी चालविण्याचा विचार करून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
कार सुरु केल्यानंतर झिगझॅग मोशनमध्ये कार चालवावी लागते. पुढे वळण पार करून कार रिव्हर्स मोडमध्ये माघारी घ्यावी लागते. हा रस्ता नसतो तर पांढरी रेषा काढून आखलेला रस्ता असतो, त्याला दोन्ही बाजुने कमी कमी अंतरावर सेन्सर लावलेले असतात. या सेन्सरला गाडी आदळली तर लायसनची टेस्ट फेल होते.
यानंतर 8 आकारात कार चालवावी लागते. काटकोणी आकारात वळणावर वळवावी लागते. रिव्हर्स मोडमध्ये तर मोठ्या वळणावर बरेच अंतर चालवावी लागते. यामुळेच ही टेस्ट कठोर ठरते. या दोन पांढऱ्या पट्ट्यांमधील अंतर एवढेच असते की एकच कार पास होऊ शकेल. ही टेस्ट जो पास होईल त्याच्या हातून छोटे-मोठे अपघातच नाही तर गाड्या घासण्याची घटनाही होणार नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.