बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका तरुणाचे जबरदस्ती लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. बिहारमध्ये एक तरुण बीपीएससी परिक्षा पास झाला. यामुळे त्याला सरकारी नोकरी मिळणार आहे, तरुणाचा निकाल समोर येताच, परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली. त्याला शिक्षकाची नोकरीही मिळाली, यानंतर लगेच काही दिवसातच त्या तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्ती लग्न लावून दिले.
बीपीएससी पास शिक्षक गौतम यांचे रेपुरा येथील अपग्रेडेड मिडल स्कूलमधून अपहरण करण्यात आले होते. शिक्षक बेपत्ता होताच कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि रास्ता रोको केला. पोलिसांनी नातेवाईकांना आश्वासन दिल्यानंतर लोकांनी आंदोलन थांबवले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. महनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर देधपुरा गावातून अपहरण झालेल्या शिक्षक गौतमला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासोबत त्याची नवविवाहित वधूही सापडली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे, तरुणाने पोलिसांना दिलेली माहिती अशी, माझे त्यांनी बंदुकीच्या धाकावर जबरदस्तीने लग्न केले होते. लग्नासाठी अपहरण करून राजेश राय नावाच्या व्यक्तीच्या मुलीशी लग्न केल्याचे सांगितले.
फिल्मी स्टाईलने ५ ते ६ जण स्कॉर्पिओ घेऊन शाळेजवळ पोहोचले आणि गौतमला मारहाण करून त्याचे अपहरण केले. काही दिवसापूर्वीच गौतम नोकरीवर रुजू झाला होता. पकडौआ मॅरेजबाबत पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांकडे आरोपींची माहिती होती तर लग्न का थांबवले नाही, असा सवाल नागरिक करत आहेत.
शिक्षकाच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा का केला? याआधी २०१९ मध्येही विनोद नावाच्या तरुणाचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयाने ते अवैध ठरवले होते. पाकडौआ लग्नाला हायकोर्टाने मान्यता दिली नाही. नुकताच पाटणा हायकोर्टाने राज्यातील पाकडुआ लग्नाच्या एका जुन्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. हिंदू विवाह कायद्यानुसार जबरदस्तीने किंवा दबावाखाली सिंदूर लावणे हा विवाह नाही, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.