आजकालच्या तरुणांमध्ये मॉडिफाईड दुचाकींची क्रेझ चांगलीच वाढली आहे. गर्दीतून वेगळं दिसण्यासाठी तरुण आपल्या दुचाकीमध्ये वेगवेगळे बदल करतात. यामध्ये दुचाकीच्या कलरपासून ते सायलेंसर आणि नंबरप्लेटऐवजी फिल्मी डायलॉग लिहीण्यापर्यंत मजल गेली आहे. तसेच, ट्रीपल सीट किंवा चारजण बसून स्टंट मारण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. आता अशाच प्रकारच्या एका घटनेत तीन तरुणांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
या तीन तरुणांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यूपी पोलिसांही त्यांच्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो शेअर केले आहेत. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्याचीतील ही घटना असून, व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तीन तरुण हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना दिसत आहेत. तसेच, त्यांच्या दुचाकीला नंबरप्लेटऐवजी 'बोल देना पाल साहब आये थे' असा डायलॉग असलेली प्लेट लावली आहे.
याशिवाय, या तरुणांनी आपल्या मॉडीफाईड दुचाकीत कर्कश आवाजाचे सायलेंसरदेखील लावले होते. ही दुचाकी ज्या भागातून जायची, त्या भागात मोठा आवाज व्हायचा. लोकांना त्रास देण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी त्यांनी हे केले होते. आता पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांचे फोटोही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.