नवी दिल्ली - सोशल मीडियावर जगभरातील अनेक गोष्टी या जोरदार व्हायरल होत असतात. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. फूड डिलिव्हरीसाठी भरपावसात उभ्या असलेल्या एका डोमिनोजच्या डिलिव्हिरी बॉयचा फोटो हा सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी डिलिव्हिरी बॉयच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. डोमिनोजने देखील मुसळधार पावसात काम करणाऱ्या आपल्या बॉयचं भरभरून कौतुक केलं आहे. डोमिनोजने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील डिलिव्हिरी बॉयचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
शोवन घोष (Shovon Ghosh) असं डोमिनोज इंडिया (Dominos India) च्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. यामुळे कोलकातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच परिसरात भरपूर पाणी साचलं होतं. गुडघ्याभर पाण्यात डोमिनोजचा डिलिव्हरी बॉय शोवन फूड ऑर्डर दिलेल्या व्यक्तीची वाट पाहत होता. डोमिनोजने 12 मे रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शोवनचा पाण्यात उभा असलेला फोटो ट्विट करून कौतुक केलं आहे. यानंतर अनेकांनी ते ट्विट रिट्विट केलं असून त्याच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे.
डोमिनोजने शोवनच्या फोटो सोबतच "एक सैनिक कधीच आपल्या कर्तव्यापासून दूर जात नाही. आमच्याकडे ते निळ्या रंगात येतात आणि कोलकाताच्या पावसामध्ये गरमागरम ताजं आणि सुरक्षित अन्न लोकांना प्रदान करतात. आम्ही आमच्या #DominosFoodSoldier शोवन घोषच्या सेवेला सलाम करतो. ज्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील पावसात अडकलेल्या आपल्या ग्राहकांला भोजन देण्याची तयार दाखवली आणि ते पोहोचवलं" असं म्हटलं आहे. डोमिनोजच्या या डिलिव्हरी बॉयने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.