सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये एक आई आपल्या सैनिक पुत्राला निरोप देताना दिसत आहे. मुलगा सीमेवर जाण्यासाठी निघत असताना आई दरवाज्याच्या मागे अश्रू पुसताना दिसत आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेक जण भावुक झाले.
निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी त्यांच्या ट्विवर अकाऊंटवरून जवान आणि त्याच्या आईचा फोटो ट्विट केला. 'मी जवळपास तीन दशकांपूर्वी माझ्या आईला गमावलं. मी तिला प्रत्येक सैनिकाच्या आईमध्ये पाहतो. मी तिला भारतमातेमध्ये पाहतो. आई तुला सलाम,' अशा भावना दुआ यांनी व्यक्त केल्या आहेत. या ट्विटला ३७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
दुआ यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'मी अनेकदा हा फोटो पाहिला. हा फोटो बघताना प्रत्येकवेळी अंगावर शहारा येतो,' अशी कमेंट एकानं केली आहे. 'हा फोटो पाहून आमचे डोळे उघडतात,' अशा भावना आणखी एकानं कमेंटमधून व्यक्त केल्या आहेत. 'सैन्यात असलेला मुलगा ज्या दिवशी पुन्हा सीमेवर जाण्यासाठी निघतो, तो मुलासाठी आणि आई-वडिलांसाठी भावुक क्षण असतो. सैनिकाची आई सर्वात धाडसी असते, त्यांना माझा सलाम,' अशा शब्दांत आणखी एकानं जवानांच्या आईला सॅल्युट केला.