Viral Video : अगदी अलिकडेच रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेने तिकिट चेकिंग अभियान सुरू केले. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने उपनरीय मार्गावरील गाड्या, मेल एक्स्प्रेस आणि विशेष गाड्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या अभियानामार्फत असंख्य फुकट्या प्रवाशांना रेल्वेकडून चांगलाच चाप बसला. शिवाय रेल्वेने या अभियानातून लाखोंचा दंड देखील वसूल केला. तरीसुद्धा हे फुकटे प्रवासी ऐकायला तयार नाहीत. अशाच फुकट्या प्रवाशांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तरी किमान तिकीटे काढण्याचे शहाणपण रेल्वे प्रवाशांना येईल.
सोशल मीडियावर रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सिक्कीम- महानंदा एक्सप्रेस एसी कोचमधील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळते आहे. दिल्ली ते पश्चिम बंगामधील अलिपूरद्वार या मार्गावर धावणाऱ्या सिक्कीम- महानंदा एक्सप्रेसमध्ये फुकट्या प्रवाशांचा हैदोस पाहायला मिळत आहे. एसी कोचच्या प्रथम श्रेणीतील डब्ब्यात हे फुकटे प्रवासी घुसल्याने त्यातील आरक्षित तिकिटाने प्रवास करणाऱ्यांची घुसमट झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये एसी कोचचा व्हरांडा या फुकट्या प्रवाशांनी व्यापुन टाकला आहे असे व्हिडीओतुन स्पष्ट दिसत आहे.
या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका संतप्त प्रवाशाने ही संपूर्ण माहिती एक्सवर शेअर केली. सध्या महानंदा एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनी एसी कोच जाम केला आहे. इंडियन रेल्वेने अशा फुकट्या प्रवाशांचा जरूर विचार करावा. याचा नाहक त्रास तिकीट काढून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना होतोय. अशी सूचक प्रतिक्रिया या एक्स यूजरने केली आहे. त्यानंतर रेल्वेप्रशासनाकडून रेल्वेसेवा या रेल्वेच्या ऑफिशिअल हँडलवरून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या व्हारल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. १८ डिसेंबरला शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
येथे पाहा व्हिडीओ :