मैत्री हे असं नातं आहे जे रक्ताचं नसलं तरीही अगदी जवळचं आणि खास असतं. लोक मित्रांसाठी जीवही देऊ शकतात. आपल्या मदतीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारे खास मित्र नशीबवान लोकांनाच मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये वय कोणतंही असो, मित्रांमधील प्रेम तसंच राहतं हेच सांगितलं आहे.
ग्रीन बेल्ट आणि रोड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष @ErikSolheim यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ केवळ चकीत करणाराच नाही तर भावनिकही आहे. कारण या व्हिडीओमध्ये लहान मुलांमधील प्रेम दिसतं. यात काही मुलं स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या एका अपंग मित्राला निस्वार्थपणे मदत करताना पाहायला मिळत आहे. सर्वत्र या विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक होत आहे.
व्हिडीओच्या कॅप्शननुसार, 20 मे रोजी चीनच्या सिचुआनमध्ये 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे एक शाळाही हादरली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाबाहेर धावताना दिसत आहेत. मात्र यादरम्यान त्यांनी असं काम केलं की सगळेच त्यांची कौतुक करू लागले. या मुलांसोबत त्यांचा एक वर्गमित्रही आहे, जो व्हिलचेअरवर बसलेला दिसतो. इतर मुलं पळू लागली तेव्हा काहींनी त्या विद्यार्थ्याकडेही लक्ष दिलं. त्यांनी आपला जीव वाचवण्याऐवजी आधी त्या विद्यार्थ्याला वाचवण्याचा विचार केला. त्यांनी व्हिलचेअरच्या मदतीने त्याला क्लासरूममधून बाहेर काढलं आणि आपल्यासोबत शाळेबाहेरील रिकाम्या जागेत नेलं.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला 35 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी रिट्विट करून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिलं की वर्गमित्र आणि मित्रांमध्ये फरक आहे. हा फरक या व्हिडिओमध्ये दिसत आहे, ते सर्व मित्र आहेत. एका व्यक्तीने सांगितलं की, व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की, या संपूर्ण प्रक्रियेचा मुलांना खूप अनुभव आहे. तर एकाने हा मानवतेचा खरा चेहरा असल्याचं म्हटलं. याशिवाय अनेकांनी या मुलांचं भरभरून कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.