यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावेळी टॉप-३ मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. श्रुती शर्मा देशात पहिली, अंकिता अग्रवाल दुसरी आणि गामिनी सिंगला तिसी आली आहे. एकीकडे यूपीएससीत यश प्राप्त केलेले उमेदवार आनंद व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी कठोर परिश्रम केले पण यश प्राप्त करू शकलेले नाहीत. अशाच अपयशी उमेदवारांपैकी एकानं ट्विटरवर आपली वेदना व्यक्त केली. त्यानंतर नेटिझन्स त्याचं मनोबल वाढवण्यासाठी धावून आले.
अमरावतीच्या कुणाल विरूळकर (Kunal Virulkar tweet on UPSC) याचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये त्यानं आपलं दु:ख मांडलं आहे. अनेक प्रयत्न करूनही तो यूपीएससी क्लिअर करू शकला नाही. तसं तर ही वेदना केवळ कुणालचीच नव्हे, तर UPSC ची मनापासून तयारी करणार्या अनेक अपयशी उमेदवारांची वेदना आहे. अशा परिस्थितीत त्यांची निराशा होणं साहजिक आहे कारण या परीक्षेसाठी लोकांनी जे कष्ट घेतले, ते कदाचित इतर कोणत्याही परीक्षेसाठी करावं लागत नाहीत.
कुणालनं ट्विटरवर व्यक्त केलं दु:ख“10 वेळा अटेम्प्ट, 6 मेन्स, 4 वेळा इंटरव्ह्यू देऊनही माझी UPSC मध्ये निवड होऊ शकलो नाही. माझ्या नशिबात काय लिहिलं आहे माहीत नाही", असं ट्विट कुणाल विरूळकर यानं केलं. त्यानं आपली निराशा ट्विटच्या माध्यमातून व्यक्त करताच नेटिझन्स त्यांला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आलेले पाहायला मिळाले. नाराज होण्याचं काहीच कारण नाही. प्रयत्नांती परमेश्वर, कधी ना कधी यश मिळेलच अशा भावना नेटिझन्सनं व्यक्त केल्या आहेत.
नेटिझन्सनं दिलं प्रोत्साहनकुणालच्या या ट्विटला ५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे आणि ३०० हून अधिक लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्याचं दु:ख आपलं मानून अनेकांनी त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. “कुणाल, तू एक आत्मविश्वासू व्यक्ती आहेस. तुमच्यासाठी भविष्यात यापेक्षाही चांगलं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. तुझ्यात अतुलनीय क्षमता आणि चिकाटी आहे", असं IAS अधिकारी जितिन यादव यांनी ट्विट केलं आहे. तर एका नेटिझननं "सर, तुम्ही आधीच विजेते आहात. देव तुम्हाला असं काहीतरी करण्याची संधी देत आहे जे त्याला तुमच्याकडून घडवून घ्यायचं आहे". तर एका ट्विटरकरानं "प्रयत्न करत राहा पण हार मानू नका", असं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींचंही एक ट्विट शेअर करून अनेकांनी कुणालचं मनोबल वाढवलं आहे. मोदींनी आजच ज्यांची यावेळी निवड होऊ शकली नाही अशा उमेदवारांना नाउमेद न होण्याचं आवाहन केलं आहे.