अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या पाण्यातून वाचवलेल्या व्यक्तीला किंवा हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला सीपीआर दिलं जातं म्हणजे तोंडाने श्वास देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे असं काही एखाद्या प्राण्यासोबत केलेलं तुम्ही कधी पाहिलं नसेल. त्यातल्या त्यात पालीसोबत अजिबातच पाहिलं नसेल. मात्र, अशी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पालीला तोंडाने श्वास देऊन तिचा जीव वाचवला आहे.
ऑस्ट्रेलियातील एक व्यक्ती बारमध्ये बीअर पित बसली होती. अचानक एक पाल त्याच्या बीअरच्या ग्लासमध्ये पडली. आधी तर त्याला ती पाल खोटी असल्याचं वाटलं. पण नंतर ती पाल खरी असल्याचं त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तिला पटकन बाहेर काढलं आणि तिला तोंडाने श्वास देऊ लागला. नंतर पालीला उलटं करून तिच्या पोटावर बोट फिरवलं. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या या प्रयत्नाने पालीचा जीव वाचला.
या घटनेचा व्हिडीओ The Today Show ने त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'या ऑस्ट्रेलियन हिरोने त्याच्या बीअरमध्ये पडलेल्या पालीचा जीव वाचवला'. हा व्हिडीओ लोकांना आवडला असून या व्यक्तीचं कौतुकही केलं जात आहे.
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील कॉरिन्डी बीचवरील द अॅम्बे इनमध्ये ही घटना घडली. Brett नावाची व्यक्ती इथे बीअर पिण्यासाठी आली होती. आतापर्यंत हा व्हिडीओ ३ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून भरपूर लाइक्सही मिळत आहेत.