आई ही शेवटी आई असते. ती आपल्या लेकरांसाठी जे काही करते ते कुणीही करू शकत नाही. याची वेगवेगळी उदाहरणे आपण वेळोवेळी बघत असतो. आईच्या शक्तीपुढे साऱ्या जगाला झुकावं लागतं. सोशल मीडियात सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये आईचं असंच एक रूप बघायला मिळालं. उत्तर चीनच्या एका शेतात ट्रॅक्टरने काम सुरू होतं. पण अचानक एक चिमणी ट्रॅक्टरसमोर येऊन उभी राहिली. ट्रॅक्टर थांबवावा लागला, कारण ही चिमणी तिच्या अंड्यांची रक्षा करत होती.
हा व्हिडीओ चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने शेअर केला आहे. असे सांगितले जात आहे की, ही घटना उत्तर चीनच्या Ulanqab शहरातील आहे. साधारण एक मिनिटांच्या या व्हिडीओत चिमणी तिची अंडी वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. दोन्ही पंख पसरवून ती चालत्या ट्रॅक्टर समोर येते आणि त्याला रोखते.
तसं तर आपण नेहमीच बघतो की, मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पक्षी आणि प्राण्यांचा जीव घेत आहेत. पण इथे जरा वेगळं चित्र बघायला मिळालं. ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने माणूसकी दाखवली. त्याने ट्रॅक्टर थांबवला. ऊन जास्त असल्याने ड्रायव्हरने चिमणीसमोर एका बॉटलमध्ये पाणी ठेवलं. त्यामुळे लोक ड्रायव्हरचं कौतुक करत आहेत.