आजकाल वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमावणं फार काही अवघड नाही. पण पैसे कमावण्याच्या पद्धती अवघड किंवा सोप्या असू शकतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा मुलीबाबत सांगणार आहोत जी ऑनलाईन वेगवेगळ्या वस्तू विकण्याचं काम करते. पण तिची विकण्याची पद्धत अशी आहे की, जी कुणाचीही नसेल. सोशल मीडियावर दावा करण्यात आला आहे की, या तरूणीने असं करून 7 दिवसांमध्ये 155 कोटी रूपये कमावले आहेत.
ट्विटर अकाउंट @PicturesFoIder वर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे जो व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक तरूणी दिसत आहे जी ऑनलाईन वस्तू विकण्याचं काम करत आहे. ती एक सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे आणि लाईव्ह स्ट्रीमरही आहे. म्हणजे ती लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून ऑनलाईन वस्तू विकते.
तरूणी सगळ्या वस्तू कस्टमरला केवळ 3 सेकंदांसाठी दाखवते आणि मग लगेच दुसरी वस्तू दाखवते. ती वस्तू इतक्या फास्ट दाखवत आहे की, लोक व्यवस्थित बघूही शकत नाहीत. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, तरूणीचं नाव Zheng Xiang Xiang आहे आणि ती एक चायनीज लाईव्ह स्ट्रीमर आहे. तिने आपल्या या अजब पद्धतीतून 7 दिवसात 155 कोटी रूपये कमाई केली आहे.
ट्विटरवर म्हणजे आताच्या X वर या व्हिडिओला 1 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करून सांगितलं की, ही तरूणी 2017 पासून लाईव्ह स्ट्रीमच्या बिझनेसमध्ये आहे.