एका भीषण अपघातातून (Dangerous Accidnet) चमत्कारिकरित्या बचावलेल्या एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, तुम्हाला हे एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटेल. केरळमधील हे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पाहून लोक थक्क झाले आहेत. खरे तर, हा मुलगा अत्यंत भाग्यवान आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी कन्नूर (Kannur) येथील तळीपरंबाजवळील चोरुकला येथे घडला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला अपघाताचा थरार -केरळमधील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सामान्य वाहतूक असलेला एक सिंगल-लेन रस्ता दिसत आहे. एक सायकलस्वार मुलगा अचानकपणे आणि भरधाव वेगाने या रस्त्यावर येतो आणि एका दुचाकीला धडकतो. मात्र, दुचाकी थांबत नाही आणि सायकलही जागीच पडते. सुदैवाची गोष्ट म्हणजे, या धडकेनंतर सायकलवरील मुलगा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडतो आणि मागून येणाऱ्या बसखाली येण्यापासून वाचतो.
बसखाली आल्याने सायकल चक्काचूर -व्हिडीओ व्यवस्थित पाहिला की लक्षात येईल, मोटरसायकलच्या बरोबर मागे एक राज्य परिवहन बस धावत आहे. जेव्हा सायकल दुचाकीवर आदळली तेव्हा बसला ब्रेक लावायलाही वेळ मिळाला नाही आणि सायकलचा चुराडा झाला. मात्र, व्हिडीओमध्ये रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडलेला मुलगा व्यवस्थित दिसत होता.