सध्या सोशल मीडियावर एका माकडाचा वाघाचं बछडं घेऊन पळाल्याचा व्हिडीओ चर्चेत असतानाच एका बिबट्याचा आणि घोरपडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुळात २०१८ तील आहे. पण पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. IFS ऑफिसर परवीन कासवान यांनी ५ जानेवारीला हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडिया यूजर हा व्हिडीओ शेअर करू लागले आहेत.
हा व्हिडीओ जाम्बियाच्या कॅगयू सफारी लॉजमधील आहे. ज्यात एका बिबट्यावर मॉनिटर घोरपडीने आपल्या शेपटीने हल्ला केला.डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ कोस्टा फ्रॅजसाइड्सने शूट केला आहे. याबाबत कोस्टा फ्रॅजसाइड्सने सांगितले की, ते इतर लोकांसोबत सफारी करत होते. त्यावेळी त्यांना बिबट्या आणि घोरपडीची ही झुंज बघायला मिळाली.
बराच वेळ बिबट्या मॉनिटर घोरपडीकडे बघत होता. नंतर तो घोरपडीकडे चालून गेला. घोरपडीला जसे जाणवले की, आता आपला जीव धोक्यात आहे तेव्हा घोरपडीने आपली शेपटी फिरवणे सुरू केले. स्वत:ची रक्षा करण्यासाठी घोरपडीने बिबट्यावर शेपटीने हल्ला सुरू केला. बराचवेळ चाललेल्या या झुंजीत विजय अखेर अपेक्षेप्रमाणे बिबट्याचा झाला. बिबट्या घोरपडीला मानेला पकडून जंगलात घेऊन गेला.
ही घोरपड पाण्यात फार वेगाने चालते आणि पाण्यातच तिला जास्त सुरक्षित वाटतं. पण ज्यावेळी तिच्यावर हल्ला झाला तेव्हा दूरदूरपर्यंत तिच्याजवळ पाणी नव्हतं. त्यामुळे ती तेथून पळही काढू शकली नाही. अखेर तिला बिबट्याची शिकार व्हावं लागलं.