सोशल मीडियावर दररोज नवे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेदार असतात, तर काहींमधून आपल्याला काही बोध मिळतो. काही व्हिडीओ मनाला स्पर्शून जातात. इंटरनेटवर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. माणूस माणसासोबत माणसासारखा वागत नाही. माणुसकी हरवत चालली आहे, असं आपण अनेकदा ऐकतो. काही वेळा त्याचा अनुभवही घेतो. मात्र इंटरनेटवर सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ कौतुकास्पद आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर माकडाचा जीव वाचवत असताना दिसत आहे. एखादा माणूस जसा आपल्या मुलाचा जीव वाचवतो, त्याप्रमाणे या व्यक्तीनं माकडाचे प्राण वाचवले. भारतीय वन सेवेतील अधिकारी सुधा रमन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. क्रिकेटपटू आर. अश्विननंदेखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ तमिळनाडूचं असल्याचं सांगितलं जात आहे.
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून जाताना दिसत आहे. त्यावेळी त्याला रस्त्यात एक माकड बेशुद्धावस्थेत दिसतं. कुत्र्यांनी हल्ला केल्यानं माकड जखमी झालं होतं. या माकडाचं वय ८ महिने आहे. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे जखमी अवस्थेत असलेलं माकड शेवटच्या घटका मोजत होतं. आयएफएस अधिकारी असलेल्या सुधा रमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, माकडाचा जीव वाचवणाऱ्या नावाचं नाव प्रभू आहे.
प्रभू यांनी रस्त्यावर बेशुद्धावस्थेत असलेल्या माकडाची छाती दाबली. बराच वेळ ते माकडाची छाती दाबत होते. त्यानंतर त्यांनी माकडाला सीपीआर दिला. प्रभू यांनी तोंडानं माकडाला श्वास दिला. काही वेळानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. माकडाला शुद्ध आली. त्यानंतर माकडाला कुशीत घेऊन प्रभू उपचारांसाठी घेऊन गेले. प्रभू यांनी दाखवलेल्या भूतदयेचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.