अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने ग्रीन हाऊस गॅसचा पृथ्वीवर पडत असलेल्या प्रभावाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टसोबत नासाने लिहिलं आहे की, मनुष्यांमुळे तयार होणारा गॅस महासागरांना बदलत आहे, जे मनुष्यांच्या पृथ्वीवरील जीवनासाठी घातक ठरत आहे.
‘नासा’ ने ‘इंस्टाग्राम’वर एक ग्राफिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबाबत सविस्तर सांगत नासाने लिहिलं की, वेगवेगळे रंग समुद्राच्या वरच्या भागावरील तापमान दाखवत आहेत. नासानुसार, "वॉर्म कलर (लाल, नारंगी आणि पिवळा) उष्ण तापमान दर्शवत आहेत आणि कूल कलर (हिरवा आणि निळा) थंड तापमान दर्शवत आहेत".
नासाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "पृथ्वी ७० टक्के पाण्याने झाकली असल्याने समुद्र पृथ्वीवर जीवन आणि जलवायु संतुलन कायम ठेवण्यासाठी गरजेचे आहेत. तरीही मानवी कामांमुळे वाढतं ग्रीन हाऊस गॅस आपल्या डोळ्यांसमोर महासागरांना बदलत आहेत".
शेअर करण्यात आल्यानंतर या व्हिडीओला १२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याशिवाय हा व्हिडीओ ९.९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे. नासाच्या या इशाऱ्यावर लोक कमेंट करून चिंता व्यक्त करत आहेत.
एका यूजरने लिहिलं की, "चांगला डेटा आणि व्हिज्युअलायझेशन. खूप छान". दुसऱ्याने लिहिल की, "जलवायु परिवर्तन एक खूप मोठी समस्या आहे. पण कोणत्याही देशातील सरकार याबाबत गंभीर नाहीत". तिसऱ्याने लिहिलं की, "तुम्ही सांगू शकता का की, आपले समुद्र कसे बदलत आहेत आणि स्थिती बिघडण्याआधी आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे".