Social Viral : प्रवास म्हटला की, प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतच असतात. कोणाला गमतीशीर, तर कोणाला वाईट. अशाच प्रकारे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका रेल्वे प्रवासाचे चिंताजनक वास्तव समोर येत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी एका जोडप्याला अक्षरश: आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. सर्वसामान्य नागरिकांसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेन हाच सगळ्यात मोठा आधार असतो. त्याबरोबर देशातील सर्वाधिक नागरिक हे ट्रेनने प्रवास करतात. मात्र, वाढती लोकसंख्या तसेच स्थलांतरण नागरिकांचा शहरांकडे वाढता ओघ या सगळ्या गोष्टींमुळे गर्दीच प्रमाण वाढतंच चाललंय. याची प्रचिती सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल.
ट्रेनचा प्रवास आणि बसायला सीट मिळाली नाही तर कशा पद्धतीने प्रवास करावा लागतो हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच समजलं असेल. काही नेटकऱ्यांनी तर हा व्हायरल व्हिडिओ पाहताच त्यावर खरमरीत शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत. चालत्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी एक जोडपं कशा पद्धतीने तारेवरची कसरत करत आहे हे या व्हिडिओतून समजतंय.
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी एका जोडप्याला प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. चालत्या ट्रेनमध्ये चढताना जीवावार उदार होऊन हे लोक प्रवास करताना दिसत आहे. फक्त आतमध्ये जाता यावं यासाठी या प्रवाशांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्यांदा एक पुरुष हातात बॅग घेऊन मोठ्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. कशी-बशी आपल्या हातातील बॅग तो गाडीच्या आतमध्ये टाकतो आणि आपल्यासोबत असणाऱ्या पत्नीला ट्रेनमध्ये चढण्यास मदत करतो. दरम्यान हा सगळा प्रकार रेल्वे फलाटाच्या विरुद्ध दिशेने चालू असल्याचं समजत आहे.
Indian Tech & Infra नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेक यूजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. "वंदे भारत आणि बुलेटट्रेनपेक्षा आम्हाला रेल्वे ट्रॅकचा अधिक विस्तार सवलतीच्या दरातील प्रवास मिळेल याला प्राधान्य द्या." असं सूचक कॅप्शन या व्हिडिओला या यूजरने दिलं आहे.