Social Viral : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली आहे. सुनीता विल्यम्स बुधवारी बोईंग यानातून आपल्या सहकाऱ्यांसमवेत तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासासाठी रवाना झाल्या. आपला सहकारी बुच विल्मोर यांच्यासोबत सुरक्षितरित्या त्या अंतराळातील स्पेस स्टेशनवर पोहचल्या आहेत.ज्या क्षणी त्या स्पेस स्टेशनवर पोहचल्या त्या क्षणी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अशा मोहिमेवर उड्डाण करणारी पहिली महिला म्हणून सुनीता विल्यम्स यांनी नवा इतिहास रचला आहे. त्याचदरम्यान त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या अन्य वैज्ञानिकांना मिठी मारली.
दरम्यान, सुनीता विल्यम्स ज्यावेळेस स्पेस स्टेशनवर पोहचल्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्यावर तिथे त्यांचं घंटा वाजवून स्वागत करण्यात येतं. खरतरं जर कोणी नवा सदस्य अंतराळात दाखल झाला तर तिथे घंटा वाजवून त्याचं स्वागत करण्याची परंपरा असल्याचं सांगण्यात येतं. बुच यांचे अंतराळ यान लॉचिंगनंतर गुरुवारी रात्री ११.०३ च्या सुमारास स्पेस स्टेशनवर उतरलं. विल्मोर आणि विल्यम्स पुढील स्टारलाीन स्पेसक्राफ्टच्या उपप्रणालीची चाचणी घेण्यासाठी जवळपास आठवडाभर स्पेस स्टेशनवर राहतील. त्यानंतर साधारणत: १४ जूनच्या दरम्यान त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
विल्यम्स यांची १९९८ मध्ये ‘नासा’द्वारे अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती आणि त्या २००६ मध्ये मिशन १४/१५ आणि २०१२ मध्ये ३२/३३ या दोन अंतराळ मोहिमांचा भाग होत्या. त्यांनी मोहीम-३२ मध्ये फ्लाइट इंजिनिअर आणि नंतर मोहीम-३३ च्या कमांडर म्हणून काम केले.
@Boeing Space नावाच्या एक्स प्लॅटफॉर्मवर सुनीता आणि बुच यांचा अंतराळातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सुनीता विल्यम्स यांचा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.