ऑफिसमध्ये 9 तास काम करत असताना अनेक वेळा कर्मचाऱ्यांना असं वाटतं की थोडी विश्रांती मिळाली असती तर बरं झालं असतं. आपल्या देशात हे करायला मिळणार नाही, पण सध्या अशाच एका ठिकाणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जिथे कर्मचारी ऑफिसमध्येच बेडवर मस्त झोपलेले पाहायला मिळत आहेत.
बर्याच वेळा लोकांना बरं वाटत नाही किंवा थोडा थकवा येत असेल तर लोक ऑफिसच्या डेस्कवरच डोकं टेकवून थोडा वेळ आराम करतात. मात्र, यावरही कोणीतरी येता-जाता टोमणे मारतं किंवा चेष्टा करतं. मात्र आता ज्या ऑफिसचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिथे असं काहीच नाही. सर्व कर्मचारी चादर घेऊन आरामात झोपलेले आहेत.
ऑफिसमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एक डेस्क देण्यात आला आहे, जिथे कर्मचाऱ्यांच्या बॅगा आणि इतर सामान ठेवलं जातं. तुम्ही येथे पाहू शकता की एक महिला कर्मचारी तिचा फोन डेस्कवर ठेवते आणि तिची खुर्ची मागे ढकलते आणि त्या खुर्चीचा बेड होतो. तिच्याकडे उशी आणि चादर देखील आहे. ती त्यानंतर मस्तपैकी झोपते. तिच्याप्रमाणेच इतर कर्मचारीही आपापल्या बेडवर झोपलेले दिसतात.
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी कामाच्या ठिकाणी ही चांगली कल्पना आहे असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि त्यांना तो आवडलाही आहे. जपानमध्ये ऑफिसमध्ये झोपण्यासाठी एक तासाचा ब्रेक दिला जातो. येथे दुपारच्या जेवणासोबतच डुलकी घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून कर्मचारी फ्रेश होऊन पुन्हा काम करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.