Sachin Tendulkar on Tiger Plastic Bottle Viral Video: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve) कायमच चर्चेत असतो. वाघांचे दर्शन घडण्याच्या दृष्टीने पर्यटक येथे कायम हजेरी लावताना दिसतात. या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी येथे येणाऱ्या पर्यटकांवर असते. पण काही वेळा काही पर्यटक आपल्याकडील कचरा त्या परिसरात टाकतात. अशीच कोणीतरी एक प्लॅस्टिकची पाण्याची बाटली तलावात टाकली होती. ती बाटली चक्क वाघानेच बाहेर काढली आणि स्वच्छतेचा संदेश दिला. निमढेला बफर क्षेत्रात (Nimdhela Buffer Area) एक वाघीण तोंडात प्लास्टिकची बाटली (Plastic Bottle) पाण्यातून बाहेर काढतानाचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील (Tiger Reserve) प्लास्टिक व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यासोबतच त्याने साऱ्यांना खास संदेश दिला आहे.
निमढेला बफर क्षेत्रातील 'जांभूळडोह' सिमेंट बंधारा परिसरात २९ डिसेंबर रोजी वन्यप्रेमी दिप काठीकर (Deep Kathikar) या व्यक्तीने हा क्षण आपल्या कॅमेर्यात टिपला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने प्लास्टिक आणि कचरामुक्त व्याघ्र प्रकल्प ठेवण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. असं असलं तरी, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ताडोबाकडे पर्यटकांचा ओघ पाहता या व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिकच्या बाटल्या नियमित आढळत आहेत. आता या बाटल्या चक्क वाघांच्या तोंडात दिसून येत असल्याने त्यांच्या आरोग्याचा आणि संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सचिनने पोस्ट करत लिहिले आहे की, वाघीण स्वत:च्या तोंडाने तलावातील प्लॅस्टिक उचलताना दिसते. यातून आपणही शिकायला हवे की, निसर्गाची काळजी घेण्याची जबाबदारी आपलीही आहे. आपल्या पृथ्वीचे रक्षण आपणच केले पाहिजे.
सचिनच्या आधीही अनेकांनी हा व्हायरल पोस्ट केला आहे. या व्हिडीओवरून अनेकांनी आपल्या निसर्गाचे रक्षण आपणच करायला हवे असा संदेश दिला आहे.