(Image Credit : Youtube)
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात आपल्या पिल्लांना कोब्रा सापापासून वाचवणाऱ्या कोंबडीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता तसाच एक उंदराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उंदीर हा लहान जीव असला तरी आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी तोही कसा एका मोठ्या सापाच्या नाकी नऊ आणतो ते बघण्यासारखंच आहे.
इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांता नंदाने हा व्हिडीओ त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे की, 'आता हा साप पुन्हा कधीच उंदरांच्या पिल्लांच्या आजूबाजूलाही दिसणार नाही. आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. या पृथ्वीवर मातृत्वापेक्षा मोठं हत्यार नाही'.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, उंदराचं एक पिल्लू तोंडात धरून साप झरझर पुढे जात आहे. तर त्याच्या मागे उंदीर त्याच्या पिल्ल्याचा वाचवण्यासाठी धडपडत आहे. उंदराने सापाची शेपटी धरून ठेवली आहे. त्यामुळे साप पुढे जाऊ शकत नाही. साप तोंडातील पिल्लू सोडत नाही तोपर्यंत उंदीर त्याची शेपटी सोडत नाही. अखेर सापाला तोंडातील उंदराचं पिल्लू सोडून पळून जावं लागतं. हे बघितल्यावर नक्कीच वाटतं की, एक आई तिच्या लेकरासाठी काहीही करू शकते.
हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 5 हजार वेळा पाहिला गेलाय. तर 1 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि 200 पेक्षा जास्त कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत.