पतंग उडवणे प्रत्येकाला आवडत असते. भारतात मकर संक्रातीच्या निमित्ताने आकाशात निरनिराळ्या पतंग उडत असताना दिसतात. गुजरातमध्ये तर पतंग महोत्सव आयोजित केला जातो. पतंगबाजी करणं अनेक तरुणांना आकर्षिक करतं. परंतु या पतंगामुळे एका तरुणाचा जीव टांगणीला लागल्याचं भयानक चित्र पाहायला मिळालं. श्रीलंकेतील जाफना येथील हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक मुलगा पतंग उडवत उडवत आकाशाच्या दिशेने जात असल्याचं दिसून येते. अनेक वेळ तो पतंगाला असलेल्या मांज्याच्या सहाय्याने हवेत लटकत राहतो. श्रीलंका ट्विटनं या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात म्हटलंय की, जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा याठिकाणी पतंगबाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेदरम्यान ही अजब घटना घडली. एक व्यक्ती आपल्या टीमच्या बाकी सदस्यांसोबत एक मोठी पतंग रस्सीच्या सहाय्याने हवेत उडवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अचानक त्या रस्सीसोबत तोदेखील जवळपास ४० फूट उंच उडाला. या व्यक्तीला हवेत लटकताना पाहून उपस्थित असणारे सर्वजण हैराण झाले. ही पतंग आणि त्याला बांधलेली रस्सी इतकी मजबूत होती की हा व्यक्ती हवेत लटकला. त्याच्या सहकारी मित्रांनी त्याला रस्सी सोडण्यास सांगितले कारण आणखी वर जाऊ नये. त्यानंतर हळूहळू पतंग खाली आली असता व्यक्तीने रस्सी सोडली आणि जमिनीवर आपटला.
या दुर्घटनेत संबंधित व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. परंतु थोडक्यात त्याचा जीव बचावला. सध्या जखमी व्यक्तीवर प्वाइंट पेड्रो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हा व्यक्ती त्याच्या मित्रांसह पतंग उडवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु जशी पतंग हवेत उडायला लागली तेव्हा इतर मित्रांनी ती सोडली परंतु या व्यक्तीने ती पकडूनच ठेवली होती. त्यामुळे पतंगासोबत हा व्यक्तीही हवेत उडू लागला. श्रीलंकेच्या जाफनामध्ये थाई पोंगलच्या निमित्ताने पंतग उडवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावेळी मोठमोठ्या पतंग हवेत उडवल्या जातात.