ठाणे: सोशल मीडियावर अनेकदा वाहनांच्या, दागिन्यांच्या चोरीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता मंदिरातील एका चोरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ठाण्यातील एका मंदिरात अजब घटना घडली आहे. देवाला नमस्कार करून चोरानं दानपेटी चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खोपट बस आगार परिसरात असलेल्या कबीरवाडी हनुमान मंदिरात ही घटना घडली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
व्हायरल व्हिडीओमध्ये चोर मंदिरात चोरी करण्याआधी मोबाईलवर फोटो काढत आहे. यादरम्यान तो वारंवार बाहेर पाहत आहे. त्यानं देवाच्या मूर्तीला वंदन केलं. यानंतर मूर्तीसमोर असलेली दान पेटी घेऊन चोरानं पोबारा केला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र हाती फारसं काही लागलं नाही. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात आरोपी अगदी स्पष्ट दिसून आला.
नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धूमल यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आसपासच्या लोकांकडे चौकशी केली. मंदिरात कोणत्या वेळी अजिबात गर्दी नसते, याची सर्वाधिक माहिती स्थानिकांना असते. त्याआधारे पोलिसांनी स्थानिकांना सीसीटीव्ही फुटेज दाखवलं. त्यातून संशयिताबद्दल बरीच माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी केजस म्हसदेला (१८) अटक केली. चोरीमध्ये मित्राचादेखील समावेश असल्याचं त्यानं चौकशीत सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मित्रालादेखील अटक करण्यात आली.