व्यक्तीच्या शरीरावर जन्मखूण असणं ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. काही ठिकाणी विशिष्ट अशा जन्मखुणेला काही विशिष्ट गोष्टींचं लक्षणही मानलं जातं. जन्मखूण व्यक्तीच्या हातावर, चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर असू शकते. त्वचेच्या रंगाच्या तुलनेत जन्मखूण अधिक ठळक असल्याने ती सर्वांना पटकन दिसते. त्यामुळे शरीरावर एखाद्या विचित्र ठिकाणी जन्मखूण असेल तर ती त्या व्यक्तीसाठी लाजिरवाणी बाब ठरू शकते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. नाकावर जन्मखूण असल्याने एका महिलेच्या नाकाची तुलना हरणाच्या नाकाशी करून तिला ट्रोल (Troll) केलं जात आहे.
रेवन (Revan) नावाची महिला सोशल मीडिया साईट टिकटॉकवर (TikTok) तिच्या नाकासाठी प्रसिद्ध आहे. डेली स्टार वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेच्या नाकाच्या टोकावर तपकिरी रंगाची एक जन्मखूण आहे. ही जन्मखूण पाहिल्यावर तिला नाक बसवलं आहे का, असा प्रश्न पडतो. बरेच जण तिची तुलना `बांबी` या हरणाच्या पाडसाशी करतात. बांबी ही हरणावर आधारित एक कार्टून फिल्म आहे. खरं तर रेवन खूप लोकप्रिय आहे. बरेच जण तिला ट्रोल करतात आणि तिच्या नाकाची खिल्ली उडवतात.
"माझं माझ्या नाकावर खूप प्रेम आहे"
रेवन तिला ट्रोल करणाऱ्या लोकांवर अजिबात नाराज होत नाही. रेवन नेहमीच सकारात्मक विचार करते. नुकताच रेवनने एक व्हिडिओ (Video) शेअर केला. "मी माझ्या नाकावर कधीच शस्त्रक्रिया करणार नाही. कारण माझं माझ्या नाकावर खूप प्रेम आहे आणि नाकावरची जन्मखूण मला खूप जास्त आवडते" असं तिने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसेच 'मी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसते आणि ही गोष्ट मला खूपच आवडते,' असंही ती या व्हिडीओमधून स्पष्ट करते.
"तू बांबी हरणासारखी सुंदर आहेस"
"प्रत्येक माणसात अनेक गोष्टी असतात. त्या नुसत्या डोळ्यानं दिसू शकत नाहीत" असं रेवन म्हणते. एकीकडे काही जण तिला ट्रोल करतात, तर दुसरीकडे काही जण तिचं कौतुकदेखील करतात. काही जण तिला `क्यूट` असंही म्हणतात. हरणासारखं दिसणं ही काही वाईट गोष्ट नाही. 'तू बांबी हरणासारखी सुंदर आहेस,' असंही काही जण प्रतिक्रिया देताना म्हणतात. 'तुमची जन्मखूण खरंच खूप सुंदर आहे,' असं एका व्यक्तीनं व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे. महिलेचं एका बाजूला ट्रोलिंग होत असलं तरी दुसऱ्या बाजूला या महिलेचं कौतुकदेखील काही जण करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.