मुंबई ।
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या सर्वत्र पावसानं धुमशान घातलं आहे. गावखेड्याकडील धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. त्यामुळे या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक धबधब्यांना भेट देत आहेत. यातच पावसात फिरायला जायचं म्हणजे तरूणाईची जणू काही मेजवानीच म्हणावी लागेल. दरम्यान पावसामध्ये फिरायला गेलेल्या मुलांनी ट्रक समोर केलेला एक नागीण डान्स सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे. तरुणाईच्या या नागीन डान्सचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत असून नेटकरी काही भन्नाच कमेंटस करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरूणाईचा ग्रुप रोडवरून जात असलेल्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात ट्रक चालक हॉर्न वाजवतो योगायोग असा की हॉर्नचा आवाज अगदी नागीन डान्सच्या टोनचा होता. मग काय नागीण डान्सचा हॉर्न वाजताच पठ्ठ्यांनी ठेका धरला अन् एकच कल्ला केला. विशेष म्हणजे डान्स करत असलेले काही तरूण चक्क रस्त्यावर लोळून गाण्याचा आनंद घेत होते. भररस्त्यात असं करणं खरंतर जोखीमेचं आहे कारण पावसाच्या दिवसांमध्ये दरड कोसळण्याची दाट शक्यता असते मात्र तरूणाईने या सर्वांकडे दुर्लक्ष करत आनंद साजरा करताना दिसते. त्यामुळे सध्याच्या व्हायरलच्या भाषेत बोलायचं झालं तर काय ती पोरं, काय डान्स, काय हॉर्न...एकदम 'नॉट' ओक्के असंच म्हणावं लागेल.
आंबोली घाटातील व्हिडीओने घातला धुमाकूळ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ आंबोली घाटातील आहे. मात्र तरूणांच्या या हुल्लडबाजीमुळे घाटातील पर्यटकांना आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. हा व्हिडीओ व्हायरल होत असला तरी असं करणं जीवावर बेतू शकतं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही मुलं ट्रकच्या पुढे मोटारसायकलवर येतात आणि ट्रक थांबवण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात ट्रक चालकाने हॉर्न देताच तरूणाई नागीन डान्सवर कल्ला करण्यास सुरुवात करतात.