काठमांडू : आपली गाडी बिघडली किंवा बॅटरी खराब झाली तर ढकलस्टार्ट करूण्यासाठी गाडीला धक्का देतो. यानंतर गाडी सुरु झाली की एकतर गॅरेजमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी पोहोचतो किंवा ट्रॅफिकला रस्ता मोकळा करून देतो. परंतू आपल्या शेजारच्या देशातून असा व्हिडीओ आला आहे, जिथे प्रवासी विमानाला धक्का मारत आहेत.
नेपाळच्या बजराच्या कोल्टी विमानतळावरील हा प्रकार आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात शेअर केला जात आहे. तारा एअरलाईन्सचे विमान बिघडले होते. यामुळे विमानतळावरील सुरक्षा रक्षक आणि त्या विमानाचे प्रवासी या विमानाला धक्का देत होते. नेपाळी पत्रकार सुशील भट्टाराई यांच्यानुसार तारा एअरचे हे विमान रनवेवर उभे होते. या विमानाचा टायर फुटला होता. यामुळे अन्य विमानांना उतरण्यास आणि उड्डाण करण्यास समस्या येत होती.
विमानतळावर या परिस्थितीशी सामना करण्यासारखी यंत्रणा नव्हती. यामुळे हे विमान रनवेवरून बाजुला करण्यासाठी तिथे असलेल्या प्रवाशांना आणि सुरक्षा रक्षकांना विमानाला धक्का द्यावा लागला.
तारा एअरच्या या धक्कामार विमानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एका युजरने कमेंट केली आहे. काही अज्ञानी लोक टायर फुटल्यानंतरचा व्हिडीओ पाहून तारा एअरची खिल्ली उडवत आहेत. हे कोणत्याही एअरलाईनसोबत होऊ शकते. मात्र, नेपाळच्या विमानोड्डाण प्राधिकरणाचा यात दोष आहे. त्यांच्याकडे विमानतळ चालविण्यासाठी पुरेशी उपकरणेच नाहीत.
नेपाळी प्राधिकरण एअरलाईन कंपनीकडून बक्कळ वसुली करते. मात्र, त्या बदल्यात त्यांना सुविधा देत नाही. तारा एअर ही एकमेव कंपनी हिमालय परिसरातील आव्हानात्मक विमानतळांवर विमानसेवा देते. नेपाळी लोक या एअरलाईनला चांगली कंपनी मानतात.