Father Daughter Love Video: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाने किंवा मुलीने आयुष्यात खूप प्रगती करावी, आपण त्यांच्यासाठी पाहिलेली स्वप्ने यशस्वीपणे पूर्ण करावीत. मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आई-वडिल वेळप्रसंगी आपल्या पोटालाही चिमटा काढायला पुढे-मागे पाहत नाहीत. आई-वडीलांना जसे आपल्या मुलाबाळांवर प्रेम असेत, तसेच मुलांनाही आपल्या पालकांचे नाव मोठे करावेसे वाटते. आपल्या आई-वडीलांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्यासाठी मुलं नेहमीच प्रयत्न करत असतात. सध्या अशाच एका बाप-लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुलीच्या कृतीने तिचे वडीलच नव्हे तर व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण भारावून जाईल हे नक्की. चला जाणून घेऊया, काय आहे तो व्हिडीओ.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका विमानातील आहे. या व्हिडीओमधील मुलगी ही त्या विमानाची पायलट म्हणजेच वैमानिक आहे. तिच्यावर त्या विमानाचे यशस्वी उड्डाण करण्याची जबाबदारी आहे. विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी ती मुलगी प्रवाशांमध्ये बसलेल्या आपल्या वडीलांच्या पाया पडते आणि त्यांचे आशीर्वाद घेते. या व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवरून तुफान व्हायरल झाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव आणि वडीलांच्या चेहऱ्यावरचे समाधान स्पष्टपणे दिसते.
हा व्हिडीओ कॅप्टन कृतज्ञा हाले हिने एअरबस ३२० मधून पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शनदेखील अतिशय भावनिक पद्धतीने देण्यात आले आहे. "पायलट लेक आपल्या वडीलांना आज विमानाची सफर घडवणार आहे. बापाचे आनंदाश्रू, आम्ही उड्डाण करण्याआधीच घेतलेले त्यांचे आशीर्वाद, मी पालकांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कधीच घराबाहेर पडत नाही. कधी कधी मी पहाटेच्या विमानाची पायलट असते. अशा वेळी मला घरातून ३-४ वाजता निघावे लागते. अशा वेळी माझे आई-वडील अतिशय गाढ झोपेत असतात, पण तरीही त्यांच्या पायाला स्पर्श करून, त्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय मला दिवसाची चांगली सुरूवात झाल्यासारखे वाटतंच नाही," असा अतिशय भावूक संदेश तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमधून दिला आहे.