काल संध्याकाळची घटना आहे. सोशल मीडियावर अचानक #प्रियावर्मा ट्रेंड सुरु झाला आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला. व्हिडीओमध्ये एक महिला अधिकारी आंदोलकाला पकडते आणि थेट त्याच्या कानशिलात लगावताना दिसते. दरम्यान, या महिला अधिकारी मध्य प्रदेशातील राजगडच्या उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा आहेत. हा व्हिडीओ न्यूज एजन्सी 'एएनआय'ने जारी केला आहे.
यामध्ये पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक झाली. यावेळी प्रिया वर्मा सुद्धा उपस्थित होत्या. कोणीतरी त्यांचे केस ओढले आणि त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली.
काय आहे प्रकरण...राजगडमध्ये कलम 144 लागू आहे. असे असतानाही भाजपाने काही कार्यकर्त्यांसोबत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपा कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. यादरम्यान, उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली.
याशिवाय, आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये प्रिया वर्मा यांच्याशिवाय, आंदोलक कार्यकर्त्यांची संघर्ष करताना दिसून आल्या. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील महिला राजगडच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता आहेत. याच आंदोलनादरम्यान निधी निवेदिता यांनी भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली.