फर्रुखाबाद - एखादा सण असो वा कार्यक्रम, २४ तास जनतेच्या रक्षणासाठी पोलीस काम करत असतात. त्यात अनेकदा सुट्टीच्या दिवशीही पोलीस ड्यूटीवर हजर राहतात. पोलिसांच्या याच कामामुळे त्यांना कुटुंबाला जास्त वेळ देता येत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या एका पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. पती पोलिसात असल्याने लग्नाला २२ वर्ष झाली तरी होळीसाठी पत्नीला माहेरी जाता आला नाही. यंदा माहेरी जायचं असा हट्ट पत्नीने पतीकडे धरला त्यानंतर पतीने वरिष्ठांकडे सुट्टीचा अर्ज केला.
माहेरी जायचा आग्रह धरून बसलेल्या पत्नीच्या हट्टापायी पतीने पोलीस अधिक्षकांकडे १० दिवसांची सुट्टी मिळावी यासाठी अर्ज केला. या पोलीस कर्मचाऱ्याला १० दिवस नाही निदान ५ दिवस सुट्टी मंजूर झाली आहे. आता या पोलीस पतीच्या सुट्टीचा विनंती अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस निरिक्षकाने सुट्टीसाठी सांगितले कारण खूप वेगळे आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फर्रुखाबादच्या फतेहगढ पोलीस ठाण्यात अशोक कुमार हे पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. अशोक कुमार यांनी पोलीस अधिक्षक अशोक मीणा यांच्याकडे विनंती अर्ज केला आहे. अशोक कुमार यांनी १० दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला होता. परंतु त्यांना ५ दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.
या विनंती अर्जात पोलीस निरिक्षक अशोक कुमार यांनी लिहिलंय की, माझ्या लग्नाला २२ वर्ष झाली आहेत. या २२ वर्षात माझी पत्नी कधीही होळीला तिच्या माहेरी जाऊ शकली नाही. त्यामुळे ती खूप नाराज आहे. यंदाच्या होळीला पत्नीने माहेरी जाण्याचा आग्रह धरत आहे त्याचसोबत मीदेखील सोबत यावं यासाठी हट्ट करत आहे. त्यामुळे मला होळीच्या सुट्टीची अत्यंत गरज आहे. मला १० दिवसांची सुट्टी मंजूर व्हावी असं अर्जात नमूद केले आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधिक्षक अशोक मीणा यांनी अशोक कुमार यांना ५ दिवसांची सुट्टी मंजूर केली आहे.