Viral Photo: विमान प्रवास आणि त्यातील किस्से हा नेटकऱ्यांसाठी मोठी गोष्ट नाही. हल्लीच्या जगात विमानप्रवास सुकर झाला असल्याने अनेक लोक हवाई मार्गाचा वापर करतात. त्यामुळे विमानातील व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात आण त्यातून विविध गोष्टी समोर येतात. सध्या विमानप्रवासातील एक विचित्र असा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो महिलेने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिला विमानप्रवासात मिळालेल्या जेवणार चक्क तुटलेला दात सापडला. त्यानंतर हा फोटो व्हायरल झालाच, पण त्यावर विमान कंपनीकडून मिळालेले उत्तर अधिक चर्चेत राहिले.
नक्की काय घडलं?
एखादा प्रवासी जेव्हा फ्लाइटमध्ये प्रवास करतो त्यावेळी त्याला सीटची समस्या असते किंवा काही वेळा त्यांना फ्लाइटच्या आत असलेल्या बाबींबद्दल अडचण दिसून येते. पण विमान प्रवासात जेवण मिळाले आणि त्यात विचित्र असं काही तरी सापडलं तर तुम्हाला नक्कीच राग येणं स्वाभाविक आहे. पण एका महिलेच्या अन्नामध्ये चक्क तुटलेला दात सापडला आणि एकच खळबळ उडाली.
वास्तविक, ही घटना ब्रिटिश एअरवेजशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना घडली तेव्हा लंडनहून दुबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एका महिलेसोबत हा प्रकार घडला. ही घटना घडली त्याचे फोटो ट्विटरवर त्या महिलेने शेअर केले. 'हा दात माझ्या जेवणात सापडला. तो माझा दात नाही. माझे सगळे दात शाबूत आहेत. प्रयत्न करूनही कस्टमर रिलेशन अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही,' असे त्या महिलेने ट्विटमध्ये लिहीले.
ब्रिटिश एअरवेजने दिले अजब उत्तर
महिलेच्या या ट्विटनंतर एअरलाइन्सने लगेच रिप्लाय देत लिहिले, 'हॅलो, हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटले. आमच्या ग्राहक संबंध संघाने तुमच्याशी संपर्क साधावा यासाठी तुम्ही तुमचा तपशील आमच्या केबिन क्रू ला दिला आहे का? सुरक्षिततेसाठी कृपया आम्हाला DM द्वारे वैयक्तिक तपशील पाठवा.' ब्रिटीश एअरवेजने दिलेले उत्तर पाहून त्याचा फोटोही व्हायरल झाला आणि यूजर्स त्यांच्यावर संतापले. 'कदाचित यावर काही तोडगा निघणार नाही,' असा संतप्त सूर नेटकऱ्यांमध्ये दिसून आला. असं असलं तरी विमानप्रवासात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. एकदा एका प्रवाशाला त्याच्या जेवणात झुरळ सापडले होते. सोशल मीडियावरही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर संबंधित विमान कंपन्यांनीही असेच उत्तर दिले होते.