नवी दिल्ली : एका महिलेने प्रसिद्ध फास्ट फूड चेन मॅकडोनाल्डच्या (Mcdonald's) विरोधात तक्रार दाखल केली असून कंपनीकडून तब्बल 105 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. महिलाचा दावा आहे की तिने कॉफी ऑर्डर केली मात्र त्या बदल्यात तिला केमिकल सर्व्हिस देण्यात आली. यामुळे तिला आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचीच भरपाई म्हणून तिने कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
कॉफीऐवजी दिले चक्क केमिकलया महिलेचे नाव शेरी हेड असे आहे. मॅकडोनाल्डच्या अमेरिकेतील एका शाखेविरुद्ध तिने ही तक्रार नोंदवली आहे. शेरीने एक Caramel Macchitato ऑर्डर केले होते. मात्र कॉफीऐवजी तिला केमिकलने भरलेला एक कप मिळाला, असा शेरीने दावा केला आहे. केमिकलमुळे तिला घशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इतर समस्यांचा देखील शेरीला सामना करावा लागत आहे. याशिवाय या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तिला सर्जरी करावी लागू शकते, असे शेरीने सांगितले.
"मी कॉफीचा एक घोटा घेतला आणि लगेचच माझा घसा बसला. यानंतर माझ्या तोंडात आणि घशामध्ये जळजळ व्हायला लागली. आता माझ्या घशामध्ये सतत त्रास जाणवत आहे आणि त्यामुळे मला सर्जरी करण्याची गरज भासू शकते", असे शेरीने म्हटले. तर शेरीने तक्रार दाखल केल्यानंतर मॅकडोनाल्डचे स्टाफ तिच्यावर भडकले असल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले.
105 कोटी रूपयांची केली मागणी फॉक्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, शेरीने तिच्या तक्रारीत नुकसान भरपाईसाठी सुमारे 24 कोटी रुपये आणि दंडात्मक नुकसानीसाठी सुमारे 81 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 21 डिसेंबर 2021 च्या या घटनेबद्दल बोलताना शेरी म्हणाली की, "मी घाबरले होते. मी केमिकल लिक्विड प्यायले आणि असे वाटले की कोणालाच माझी काळजी नाही."