woman fired from new job: कोरोना काळात सर्व व्यापार, उद्योग धंदे आणि नोकरी व्यवसाय ठप्प झाले होते. आता दोन वर्षांच्या मोठ्या अंतरानंतर हळूहळू सारं काही स्थिरस्थावर होत आहे. नोकरीच्या नवनव्या संधी लोकांना उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगारांना तर नोकरी मिळत आहेच. पण त्यासोबतच नोकरीत कंपनी बदलणाऱ्यांनाही विविध संधी उपलब्ध होत आहेत. हल्ली महागाई आणि वाढत्या गरजा पाहता सामान्यपणे कोणताही कर्मचारी नोकरीसाठी कंपनी बदलताना आपल्या पगारात शक्य तितकी वाढ मिळवण्याचा प्रयत्न करून घेतो. पण एका घटनेत पगारात मिळालेली भरघोस वाढ हेच त्या कर्मचाऱ्याचे नोकरी गमावण्याचे कारण ठरलंय. नवीन नोकरीत पगारामध्ये सुमारे १६ लाखांची वाढ मिळाल्याची माहिती एका महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला दिली. पण याच कारणामुळे त्या महिलेला चक्क नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
जून महिन्यात लेक्सी लार्सन या महिलेने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला. मार्केटिंग एजन्सीमध्ये त्या महिलेचा पगार सुमारे 56 लाख असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर टेक इंडस्ट्रीमध्ये नवीन नोकरी मिळाल्यावर तिला वर्षाला सुमारे ७२ लाखांचे पॅकेज मिळाले. व्हिडिओमध्ये लेक्सीने अमेरिकेतील डेन्व्हरमध्ये राहत असताना तिच्या खर्च करण्याच्या सवयींबद्दल सांगितले होते. त्यानंतर तिला नवीन नोकरी कशी मिळाली हेदेखील तिने सांगितले. पण लेक्सीने त्यात आपला पगार आणि मिळालेली वाढ हे देखील सांगू टाकलं. जेव्हा कंपनीला तिचे टिकटॉक अकाऊंट दिसले आणि त्यावरील हा व्हिडीओ पाहण्यात आला, त्यावेळी कंपनी आणि बॉस प्रचंड संतापले. बॉसचा राग टाळता यावा म्हणून तिने व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्यास सुरुवात केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, लेक्सीला माहित होते की नॅशनल लेबर रिलेशन अॅक्ट अंतर्गत तिला मिळालेल्या पगारावर चर्चा करण्याचा अधिकार आहे. असे असतानाही तिने व्हिडिओ डिलीट केला. या साऱ्या गोष्टींबाबत लेक्सीने सुपरव्हायजर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी काही गोष्टींचा उलगडा झाला. लेक्सीला चर्चेत असे समजले की कंपनीला सोशल मीडियावर आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल चर्चा करणे अजिबात आवडत नाही. 'लेक्सीच्या व्हिडिओमुळे कोणत्याही सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का?', असे विचारल्यावर वरिष्ठांनी त्यास नकारार्थी उत्तर दिले पण, असे लोक कंपनीत ठेवून कंपनीला धोका (रिस्क) पत्करायचा नाही असे तिला सांगण्यात आले.
व्हिडिओमध्ये लेक्सी म्हणाली- टिकटॉकमुळे माझी नोकरी गेली. तिने सांगितले की, नोकरीला लागल्यानंतर दोनच आठवड्यांनंतर कंपनीने मला काढून टाकलं. लेक्सीने सांगितले की, कंपनीने यामागे सुरक्षेचं कारण दिले. USA Today ने या संदर्भात law firm Joseph & Norinsberg LLC च्या पार्टनर बेनिटा जोसेफ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, "तुम्ही कोणतीही भेदभाव करणारी विधाने करू नका, पगार किंवा आर्थिक बाबींबाबत गोपनीयतेचा भंग करू नका, हिंसाचाराची धमकी देऊ नका आणि कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नका असे कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेले असते आणि याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कंपनीने तुम्हाला यापैकी कोणतेही काम करताना पाहिले तर या आधारावर तुम्ही तुमची नोकरी गमावू शकता", असेही त्यांनी स्पष्ट केले.