आजकाल टिक-टॉक व्हिडीओ आणि रील्स तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचा ट्रेंड आहे. व्हिडीओ काढण्याच्या नादात अनेकदा दुर्घटना देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही जणांना तर व्हि़डीओ तयार करणं चांगलंच महागात पडलं असून नोकरीही गमवावी लागली आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ज्याची सध्या सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे.
अमेरिकेतील एका महिलेला फक्त 20 सेकंदांच्या टिक-टॉक व्हिडिओमुळे लाखो रुपयांची नोकरी गमवावी लागली आहे. 24 वर्षीय महिलेचा दावा आहे की, ती वीकली ऑनलाईन मीटिंगमध्ये भाग घेत होती. याच दरम्यान तिने कॅमेरा बंद केला होता. पण माईक चालू होता. असं असताना मिशेलकडून कॉफी खाली पडली. तिने त्याचा टिक टॉक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला.
ऑफिसमधील सहकाऱ्यांचा आवाजही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आहे, याचा तिने विचारच केला नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्याच्या 24 तासांच्या आत, एचआर आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसरने तिला सांगितले की, तिने केलेला निष्काळजीपणा गंभीर आहे आणि त्यासाठी तिला ताबडतोब काढून टाकण्यात आले.
मिशेलने आता आणखी एक टिक-टॉक व्हिडीओ अपलोड करून या घटनेची माहिती दिली आहे. मिशेलने सांगितले की, ती झेन टेक नावाच्या कंपनीत काम करत होती. तिला लाखो रुपये पगार मिळायचा. पण आता तिला टिक-टॉक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"