एअरपोर्टवर साहित्याचं एक्स्ट्रा वजन असेल तर मोठी रक्कम चुकवावी लागते. त्यामुळे प्रवासी पैसे वाचवण्यासाठी वेगवेगळे कारनामे करताना दिसतात. जसे की, काही लोक एकावर एक अनेक कपडे घालतात. काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात त्या महिलेने २.५ किलो वजनाचे कपडे एकावर एक घालून विमानात एन्ट्री घेतली होती. आता एका दुसऱ्या महिलेचा किस्सा समोर आला आहे. हा फारच अनोखा किस्सा आहे. या महिलेने लगेचसाठी अतिरिक्त भरावी लागणारी रक्कम वाचवण्यासाठी स्वत:ला प्रेग्नन्ट असल्याचं सांगितलं.
रेबेका ही व्यवसायाने ट्रॅव्हल रायटर आहे. हा कारनामा तिनेच केलाय. रेबेकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यात तिने सांगितले की, तुम्ही कशाप्रकारे सामानाची पॅकिंग करून एक्स्ट्रा बॅगेज फी वाचवू शकता.
जंपसूटच्या आत सामान आणि वरून लॅपटॉप
व्हिडीओमध्ये रेबेकाने आधी लॅपटॉप आणि इतर गॅजेट्सचे वायर गुंडाळते. तसेच काही कपडे गुंडाळून जंपसूटमध्ये ठेवते. लॅपटॉप मागच्या बाजूने ठेवते आणि बाकी साहित्य समोरच्या बाजूने ठेवते. यावर तिने एक सैल ड्रेस घातला. सगळं साहित्य तिने जंपसूटमध्ये पोटाच्या भागात ठेवलेलं असतं. त्यामुळे ही महिला प्रेग्नन्ट असल्यासारखी दिसते.
एक चूक पडली महागात
अनेक विमान कंपन्या महिलांना अतिरिक्त सामानाच्या फिमध्ये सूट देतात. रेबेकाला याचाच फायदा घ्यायचा होता. तिने असेही सांगितले की, ही आयडिया यशस्वी ठरली नाही. तिने सांगितले की, 'माझी एक चूक झाली की, मी आरामात सरळ चालत गेले. टिप्स ही आहे की, तुम्ही तुमचे खांदे जरा मागे ठेवून चालावे'.
...आणि ती पकडली गेली
रेबेकाने पुढे सांगितले की, 'माझ्याकडून एकच चूक झाली. एअरपोर्टवर सर्वच कर्मचारी माझी चांगली काळजी घेत होते. त्यांनी माझ्या बॅगचं वजन केलं आणि माझ्याकडे हसून बघत होते. पण जशी मी पुढे गेले माझं तिकीट खाली पडलं आणि माझ्या तोंडून जोरात आवाज निघाला. सगळे मला पुन्हा बघू लागले. जशी मी तिकीच उचलण्यासाठी खाली वाकले, एका कर्मचाऱ्याला लॅपटॉपचा एक भाग दिसला आणि मी पकडले गेले'.