नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील करणे कठीण आहे. व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी अनेकांचे मनोरंजन करत असतात तर काही गोष्टी विचार करण्यास भाग पाडतात. सध्या महिला कैद्यांबाबत दिलेल्या एका ऑफरची खूप चर्चा रंगली आहे. आपल्या देशात कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी अनेक सुविधा ऑफर्स दिल्या जातात. मात्र एका डेटिंग वेबसाइटने (Dating Website) जेलमध्ये बंद असलेल्या कैद्यांचे भविष्य सुधारण्यासाठी त्यांना डेट करण्याची संधी दिली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक डेटिंग वेबसाइट कार्यरत आहेत, ज्या दोन लोकांना एकत्रित आणण्याचे काम करत असतात. आता एक डेटिंग वेबसाइट महिला कैद्यांना डेट करण्याची संधी देत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ही भन्नाट ऑफर 'Women Behind Bars'या वेबसाइटने दिली आहे. विशेष म्हणजे ही वेबसाइट खासकरून महिला कैद्यांना डेटिंग करता यावी यासाठी बनवण्यात आली आहे.
तुरूंगातील महिला कैद्यांना रिलेशनशिपमध्ये राहता येणारमिररने दिलेल्या वृत्तानुसार, 'Women Behind Bars'ही वेबसाइट खासकरून महिला कैद्यांना रिलेशनशिपमध्ये राहता यावे यासाठी तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटचे म्हणणे आहे की, जेव्हा कैदी तुरुंगातून बाहेर येतात, तेव्हा त्यांना त्यांचे आयुष्य नव्या पद्धतीने जगायचे असते आणि जुन्या सवयी बदलायच्या असतात. जेणेकरून त्यांना पुन्हा तुरूंगात जावे लागणार नाही. लक्षणीय बाब म्हणजे या सुविधेअंतर्गत महिला कैद्यांना कुठेही जाण्याची परवानगी दिली जाणार नाही किंवा कोणतेही शारीरिक डेटिंग करता येणार नाही. फक्त त्यांना पत्र पाठवून एकमेकांच्या संपर्कात राहण्याची परवानगी असेल. यासाठीचे शुल्कही अत्यंत कमी ठेवण्यात आले आहे.