नवी दिल्ली ।
सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण आहे, देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती ओढावली आहे. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत असताना देशातील काही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अशीच काहीशी स्थिती उद्भवल्याने उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील महिलांनी पाऊस पडावा म्हणून एक भन्नाट मार्ग अवलंबला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. खरं उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये अशी मान्यता आहे की एखाद्या व्यक्तीवर चिखल टाकल्याने अथवा त्याला चिखलात लोळवल्याने भगवान इंद्रदेव खुश होतात आणि पाऊस पाडतात. यासाठीच महाराजगंजच्या महिलांनी आपल्या शहरातील स्थानिक आमदाराला चिखलाने अंघोळ घातली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पिपरदेउरा येथील महिलांनी स्थानिक आमदार जय मंगल कन्नोजिया आणि नगरपालिकेचे अध्यक्ष कृष्ण गोपाल जैस्वाल यांना मंगळवारी रात्री चिखलाने अंघोळ घातली. महिलांनी म्हटलं की, "असे केल्याने आता मुसळधार पाऊस येईल. शहराच्या प्रमुख व्यक्तीला चिखलाने अंघोळ घातल्याने भगवान प्रसन्न होतात. पाऊस नसल्याने प्रत्येकजण चिंतेत आहे, आमच्या शेतीवर मोठे संकट ओढावले आहे त्यामुळे हे खूप गरजेचे होते. इंद्र देवांना प्रसन्न करण्यासाठी लहान मुलं चिखलात खेळतात. यासाठी वर्षोनवर्षे चालत आलेल्या परंपरेचे आम्ही पालन केले आहे."
आमदारानं दिली साथदरम्यान, भारतीय जनता पार्टीचे आमदार जय मंगल कन्नोजिया यांनी सांगितले की, "जनता भीषण गरमीमुळे त्रस्त झाली आहे आणि ही खूप जुनी परंपरा आहे. त्यामुळे पाऊस येण्यासाठी महिलांनी आम्हाला चिखलाने अंघोळ घातली." तसेच जवळपास काहीच पाऊस या भागात झाला नाही त्यामुळे शेतीवर संकट ओढावलं असून म्हणूनच आम्ही या परंपरेचे पालन केलं असल्याचं नगरपालिका अध्यक्ष कृष्ण गोपाल जैस्वाल यांनी सांगितले.