गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात जगभरातील महिला आपल्या अंतर्वस्त्राचा फोटो शेअर करुन आहेत. त्यामुळे हे का आणि कशासाठी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरंतर अशाप्रकारे फोटो शेअर करत जगभरातील महिला विरोध दर्शवत आहेत. #ThisIsNotConsent या हॅशटॅगने सुरु झालेला हा विरोध आता सोशल मीडियातून रस्त्यावरही बघायला मिळतोय. मुळात आयरलॅंड आयर्लंडच्या एका बलात्कार प्रकरणाशी याचा संबंध आहे. या बलात्कार प्रकरणात आरोपीच्या वकिलाने कोर्टात १७ वर्षांच्या पीडित मुलीच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत आरोपीचा बचाव केला आहे.
आरोपीच्या महिला वकील एलिझाबेथ ओ कॉनेल यांनी भर कोर्टात पीडित मुलीचे अंतर्वस्त्र दाखवले आणि म्हणाल्या की, 'तुम्ही हे बघा, बघा या मुलीने कसे अंतर्वस्त्र परिधान केले होते. यात हे स्पष्ट होतं की, ही मुलगी या मुलाकडे आकर्षित होती आणि दोघांमध्ये जे झालं ते सहमतीने झालं'. या मुलीने एका विशिष्ट प्रकारचं अंतर्वस्त्र परिधान केल्याचं वकिलांनी सांगितलं.
धक्कादायक बाब म्हणजे वकिलांच्या या तर्कानुसार, कोर्टाने आरोपीला निर्दोष मुक्त केलं. त्यानंतर या प्रकरणावर सोशल मीडियातून आवाज उठवला जात आहे. यासाठी जगभरातील महिला पुढे आल्या आहेत. मुद्दा हाच आहे की, कुणाच्या कपडे परिधान करण्याच्या पद्धतीवरुन त्या व्यक्तीच्या होकाराचा अंदाज कसा लावला जाऊ शकतो? सोशल मीडियात याच विरोधात महिला त्यांच्या अंतर्वस्त्रांचे फोटो शेअर करत आहेत. आणि #ThisIsNotConsent हा हॅशटॅक वापरुन 'ही सहमती नाहीये', असं सांगत आहेत.
आता केवळ सोशल मीडियातच नाही तर आयर्लंडच्या रस्त्यावरही महिला उतरल्या आहेत. आयर्लंड च्या संसदेत या विरोधात प्रदर्शने करण्यात आली. लोक रस्त्यावर येऊन आपली अंतर्वस्त्रे दाखवत आहेत. येथील संसदेतही यावर चर्चा करण्यात आली.
पीडितेच्या वकिलांचं म्हणणं होतं की, १७ वर्षाच्या मुलीवर २७ वर्षाच्या तरुणाने बलात्कार केला. तर आरोपीच्या वकिलांनी मुलगीच मुलाकडे आकर्षित होती, असा तर्क लावला. वकील म्हणाल्या की, मुलगीच या मुलाला भेटण्यासाठी तयार होती.
या घटनेविरोधात केवळ महिलाच नाही तर पुरुषही आपले अंतर्वस्त्रांच्या फोटोसह प्रदर्शन करीत आहेत. आयर्लंडची राजधानी डबलिनमध्ये महिलांनी सिटी सेंटरमध्ये अंतर्वस्त्र लटकवून प्रदर्शन केलं. कॉर्क शहरात एक महिला कोर्टातच अंतर्वस्त्र घेऊन शिरली.