तशी तर सोशल मीडियात नेहमीच सेलिब्रिटी किंवा फॅशन विश्वातील लोकांच्या कपड्यांची चर्चा सुरू असते. सध्या अशाच एका अनोख्या ड्रेसची चर्चा रंगली आहे. पण हा ड्रेस कुण्या सेलिब्रिटीचा नाही. आम्ही ज्या व्हायरल ड्रेसबाबत सांगत आहोत, त्याची खासियत म्हणजे तुम्ही या ड्रेसला इच्छा असूनही स्पर्श करू शकत नाही. बरं या ड्रेसची किंमतही तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणारीच आहे. या ड्रेसची किंमत तब्बल ७ लाख रूपये इतकी आहे. चला जाणून घेऊ या खास ड्रेस खासियत काय आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथील सिक्युरिटी कंपनी क्वांटस्टॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड मा यांनी त्यांच्या पत्नीसाठी हा खास ड्रेस तयार केला. हा ड्रेस तयार करण्यासाठी त्यांनी ९,५०० अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारण ७ लाख रूपये खर्च केलेत. एका कपड्यासाठी ही फारच मोठी किंमत आहे. खासकरून तेव्हा जेव्हा हा कपडा प्रत्यक्षात नाहीच.
हा ड्रेस एक डिजिटल ड्रेस असून हाऊस द फॅब्रिकेंटने तयार केला आहे. सध्याचा काळ हा डिजिटल काळ मानला जातो. सर्वच कामे डिजिटल पद्धतीने होत आहेत. अशात जर ड्रेसही डिजिटल पद्धतीने येऊ लागले तर त्यात आश्चर्याची तशी बाब नाही.
रिचर्ड मा हे या ड्रेसबाबत म्हणाले की, 'निश्चित हा ड्रेस फार महागडा आहे. पण हा ड्रेस एखाद्या गुंतवणुकीसारखा आहे'. ते म्हणाले की, ते स्वत: आणि त्यांची पत्नी फार कपडे खरेदी करत नाही. पण त्यांना हा ड्रेस तयार करायचा होता. महागडा असूनही हा ड्रेस तयार केला, कारण याचा वापर जास्त काळ केला जाऊ शकतो. पुढेल दहा वर्षात सगळेजण डिजिटल फॅशन वापरतील.