ज्यांना कुणाला मधमाशीचा अनुभव आला असेल आणि त्यांना जर पुन्हा मधमाशी दिसली तर त्यांची काय हालत होते हे काही वेगळं सांगायला नको. सामान्यपणे दोनप्रकारच्या मधमाश्या आपण पाहतो. एक लहान असते तर दुसरी त्याहून थोडी मोठी. ही मोठी माशी भल्याभल्यांची हवा टाइट करू शकते. ज्यांना मधमाश्यांचा सामना करावा लागला किंवा ज्यांना यांच्याबाबत माहिती आहे त्यांनी जगातली सर्वात मोठी मधमाशी कशी दिसत असेल याचा विचारही केला नसेल. विचार करा जगातली सर्वात मोठी मधमाशी पाहून तुमची काय स्थिती होऊ शकते.
जगातल्या सर्वात मोठ्या मधमाशीचं नाव 'फ्लाइंग बुलडॉग' असं आहे. सामान्यपणे आतापर्यंत ज्या मधमाश्या आपण पाहिल्या आहेत त्यांचा आकार २ एमएम ते ८ एमएम इतका असतो. पण जगातल्या या सर्वात मोठ्या मधमाशीचा आकार ६ सीएम म्हणजे ६० एमएम इतका मोठा आहे.
म्हणजे या मधमाशीचा आकार हा एका वयस्क व्यक्तीच्या अंगठ्या इतका आहे. ही मधमाशी इंडोनेशियातील एका द्वीपावर अनेक दिवसांच्या शोधानंतर आढळली. जंगलांची धुळ चाळणाऱ्या या लोकांना मोठ्या मुश्कीलीने या मधमाशीचे काही फोटो काढलेत.
क्ले बोल्ट हा नेचर फोटोग्राफर आहे. तो इथे एका दुसऱ्या फोटोग्राफरसोबत टूरला गेला होता. त्याने सांगितले की, 'इतकी मोठी मधमाशी पाहणे खरंच हैराण करणारी गोष्ट होती. तिच्या पंखांच्या फडफडण्याचा आवाज अजूनही माझ्या कानांमध्ये घोंघावतो आहे'.