नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीदरम्यान लिंबू कलरची साडी घालून ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाले होते. अनेक जणांना उत्सुकता होती ती महिला कोण आहे? ती खरचं निवडणूक अधिकारी आहे का? या प्रश्नांची उत्तरे काही काळानंतर समजली. ही महिला होती सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणारी अधिकारी रिना द्विवेदी. एका रात्रीत स्टार झालेली ही महिला अधिकारी आता पुन्हा चर्चेत आली आहे.
रिना द्विवेदीने टिकटॉक व्हिडीओ बनविला आहे. तो सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रिना द्विवेदीने तो व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. 16 सेकंदच्या या व्हिडीओमध्ये रिना द्विवेदी डान्स करताना पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान रिना द्विवेदी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका मतदान केंद्रावर काम करत होती. त्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन घेऊन जाणारे फोटो व्हायरल झाल्याने सोशल मिडीयात रिना चर्चेचा विषय बनली होती.
फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स ऐपवर देखील लिंबू कलरवाल्या रिना द्विवेदी महिलेचीच चर्चा होती. लखनऊमधील पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायकपदावर रिना द्विवेदी काम करतात. २००४ मध्ये पीडब्ल्यूडी विभागात काम करत असलेले वरिष्ठ सहाय्यक संजय द्विवेदी यांच्याशी त्यांचा झाला होता. मात्र २०१३ मध्ये संजय यांचं निधन झालं. मात्र नवऱ्याच्या निधनानंतर रिना यांनी धीर सोडला नाही. रिना यांनी पीडब्ल्यूडीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. रिना यांना १३ वर्षाचा मुलगा आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर रिना यांना भोजपुरी चित्रपटात काम करण्याची ऑफर देखील मिळाली होती.