नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावरून काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. अशाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये बाबा रामदेव हे हत्तीवर बसून योग करत असताना अचानक खाली पडल्याचे दिसत आहे. मात्र, यावेळी त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. पण, बाबा रामदेव यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोमवारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यावेळी ते मथुरामधील रमणरेती आश्रममध्ये संतांना योग शिकवत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी योग गुरु बाबा रामदेव यांनी महावन रामानरती येथील कार्ष्णि गुरु शरणानंद महाराजांच्या आश्रमातील संतांना योग शिकविला. यावेळी व्यासपीठावर गुरु शरणानंद महाराजांनीही बाबा रामदेव यांच्यासोबत योग केला. यावेळी बाबा रामदेव यांनी हत्तीवर बसून योगासने केली. यादरम्यान एक व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. जो सुमारे 22 सेकंद आहे. ज्यामध्ये बाबा रामदेव हत्तीवर बसून योगासने करत आहेत. मात्र, अचानक हत्तीने हालचाल केली. त्यावेळी बाबा रामदेव यांचा तोल गेल्यामुळे आणि ते हत्तीवरून खाली पडले. मात्र, यावेळी त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
दरम्यान, सोमवारी बाबा रामदेव यांनी संतांना योगासनापासून होणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती दिली. त्यांनी अनुलोम-विलोम आणि इतर योगासने शिकवली. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, 'अगदी कठीण रोग देखील योगामुळे बरे होतात. लोकांनी सकाळी आणि संध्याकाळी योग केले पाहिजे'. तर, लोक प्राचीन काळापासून योग करत आहेत, असे शरणानंद महाराज यांनी यावेळी सांगितले.