मुंबई - राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने थैमान घातले असून नदी, नाले, ओसंडून वाहत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे बंधारे भरले आहेत, नद्यांनाही पूर आला आहे. अनेक पुलांवरुन पाणी वाहत असून दरडी कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. त्यातच, पावसाळ्यातील नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पर्यटनस्थळावर गर्दी करत आहेत. धबधब्याजवळ, समुद्रकिनारी लाटांच्या आनंदात फोटो काढण्याचा मोह तरुणाईला जडला आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाईक पेक्षा तुमचं लाईफ महत्त्वाचं असल्याची एक पोस्ट एका आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केली आहे.
आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी ट्विटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, समुद्राशेजारी असलेल्या खाडीवर पर्यटक मोठ्या प्रमाणात लाटांचा आनंद घेताना दिसून येतात. या आनंदात फोटो, सेल्फी काढण्याचा मोहही पर्यटकांना आवरता येत नाही. खवळलेल्या समुद्राच्या उसळलेल्या लाटा जेव्हा खाडीवर येऊन आदळतात तेव्हा पाण्याचा उंच उडणारा फवारा पावसाप्रमाणे खाडीवरील पर्यटकांच्या अंगावर पडतो. या आनंदात हे पर्यटक देहभान विसरल्याचे दिसून येते. याच दरम्यान, दुसरी मोठी लाट येते असून उसळलेली ही लाट आपल्या सोबत दोन पर्यटक मुलींना समुद्रात घेऊन जाते, असे भयानक चित्र या व्हिडिओत दिसत आहे. त्यावेळी, निसर्गशक्तीपुढे हतबल झालेले पर्यटक आणि तिचे कुटुंबीय पाहून मन विषिन्न होते.
दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला असून यासोबत महत्त्वाचं वाक्य लिहिलं आहे. Your "Life" is more important than your "Likes". म्हणजेच, तुमचं आयुष्य हे तुम्हाला मिळणाऱ्या लाईकपेक्षा अधिक मौल्यवान आहे, असे काबरा यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओतून नक्कीच तरुणाईने आणि पर्यटकांनी बोध घ्यायला हवा. कारण, सध्या पुराच्या पाण्याचा अंदाज न बाळगताच पर्यटक पाण्यात गाडी घालतात, स्वत:ही पुरात उतरतात. त्यामुळे, अतिधाडस आणि अतिउत्साह हा अनेकदा जीवावर बेतू शकतो. त्यामुळेच, जीवाची काळीजी घेऊनच पर्यटकांनी पाण्याशी खेळावं. कारण, जान है तो जहाँन है...!