आपल्या पिल्लावर हल्ला करणाऱ्या सिंहीणीच्या तावडीतून त्याला सोडवणाऱ्या झेब्र्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या मुलासाठी आई काय करू शकते, याचं उदाहरणच सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतून दिसून येत आहे. या व्हिडिओवर सध्या नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
शिकारीच्या शोधात असलेल्या सिंहीणीनं झेब्र्याच्या पिल्लावर हल्ला केल्याचं या व्हिडिओत दिसतं. सिंहीणी जेव्हा एखाद्या प्राण्यावर हल्ला करते, तेव्हा आपले दात तिच्या मानेत घुसवते. आपली नखं आणि दात यांचा वापर करून समोरच्या प्राण्याला गुडघ्यावर आणते आणि मग शिकार करते. एखाद्या प्राण्याच्या मानेवर वार केल्यानंतर तो प्राणी अर्धमेला होतो आणि त्याची शिकार करणं सोपं जातं. त्यासाठी वाघ किंवा सिंह हे प्रत्येक प्राण्याच्या मानेला निशाणा बनवताना दिसून येतात.
सिंहीणीने झेब्र्याच्या पिल्लाचा ताबा घेतलाच होता. त्याच्या मानेचा घोट घेऊन त्याला ठार करण्याच्या बेतात ती असतानाच झेब्रा आईने सिंहीणीला जोरदार लाथ मारून मागे ढकलले. अचानक झालेल्या या हल्ल्याने सिंहीणीही काहीशी चपापली. मात्र सिंहीणी प्रचंड भुकेली असल्याने तिने आपली शिकार न सोडण्याचा निर्णय़ घेतला आणि पुन्हा एकदा पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
शिकार करणाऱ्या सिंहीणीला झेब्र्यानं चांगलीच झुंज दिली. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता तिने सिंहीणीसोबत संघर्ष सुरू ठेवला. झेब्र्याचा जोष पाहून सिंहीणीही मग गांगरली आणि तिने माघार घेतली. त्यानंतर आपल्या पिल्लाला घेऊन झेब्र्यानं तिथून काढता पाय घेतला. आपल्या डोळ्यांदेखत आपली शिकार घेऊन जाणाऱ्या झेब्र्याकडे पाहत राहण्याशिवाय सिंहीणीकडे कुठलाच पर्याय उरला नाही.